काळाने अचानक वडिलांचे छत्र हिरावले; जुळ्या मुलींनी मनाचा दगड करून दहावीची परीक्षा दिली 

संगमेश्वर : वडील आणि मुलीचे नाते यांची गुंफण शब्दापलीकडची असते. त्यात बाप नेहमीच मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न पाहत असतो. अशाच वडिलांचं अचानक निधन होत, डोक्यावरचा मायेचा हातच काळ हिरावून नेतो आणि दुसर्या दिवशी दहावीचा पेपर असतो… एकीकडे अचानक झालेले वडिलांचे निधन आणि दुसरीकडे भविष्याची वाट दाखवणारी परीक्षा… यात मुली वडिलांच्या स्वप्नांना महत्व देतात आणि घरात वडिलांचे प्रेत असतानाही दहावीचा पेपर देतात…

 

अशी मन हेलावून टाकणारी ही कहाणी आहे संगमेश्वर तालुक्यातील रांगव-कुंभारवाडी येथील या दोन जुळ्या बहिणी तन्वी व जान्हवी दीपक कुंभार यांची. दहावीची परीक्षा सुरू असल्याने घरातील वातावरण पूर्णपणे परीक्षेचे होते. मंगळवारी इतिहासाचा पेपर असल्याने या दोघी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होत्या. अभ्यास पूर्ण होताच झोपण्याची तयारी सुरू असतानाच वडील दीपक कुंभार यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रात्रीच तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले; मात्र दीपक कुंभार यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या मृत्यूच्या धक्क्याने घरात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यातच मंगळवारी इतिहासाचा पेपर होता. अशावेळी काय करायचे हा प्रश्न होताच. पण वडिलांनी मुलींसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण कारणे ही या मुलींची जबाबदारी होती. जाणत्या लोकांनी दोघींचा मनाची तयारी केली. आभाळा एवढ दु:ख मनात ठेवून परीक्षेला जाण्याची तांची तयारी केली आणि अखेरीस दोन्ही बहिणी कडवई भाईशा घोसाळकर हायस्कूल येथे परीक्षा देण्यासाठी गेल्या.

 

 

कुंभार कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडिलांचे हातावरील पोट असल्याने दिवसभर रोजगार करून घर चालवत. नावालाच जमीन असल्याने उत्पन्नापेक्षा कसायला खर्च जास्त असल्याने शेती सोडली. त्यामुळे मिळेल ते काम आणि देतील ते दाम, या न्यायाने वडील काम करून संसार चालवत होते. कुटुंबात सातजण. चार मुली, आई आणि पत्नीची साथ होती. मोठ्या मुलीने शिक्षण अर्धवट सोडून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी धरली. वडिलांच्या जाण्याने कुटुंबासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.