खेड नगर परिषद थकित करदात्यांकडून आकारणार दंडाची रक्कम

खेड(प्रतिनिधी) खेड नगर परिषदेने मालमत्ता करासह घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम वसुलीसाठी कंबर खचली आहे. यासाठी पथकेही कार्यरत आहेत. थकित पाणीपट्टीधारकांचे नळकनेक्शन बंद करण्याची मोहीमही हाती घेतली आहे. या पाठोपाठच आता नगर परिषदेने थकित रक्कमेवर प्रतिमहा २ टक्के म्हणजेच वार्षिक २४ टक्के दंडाची रक्कम आकारणार आहे. तसा फतवाही नगर परिषदेने काढला आहे.
थकित करदात्यांना कराची रक्कम भरणा करण्यासाठी सातत्याने सूचना केल्या जातात. तसेच नोटीसाही बजावल्या जातात. मात्र तरीही करदाते कराची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. या पार्श्वभूमीवर नगर प्रशासनाने आता थकित रक्कमेवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडाभरात पाणी विभागातील पथकाने हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान ५०हून अधिक पाणीपट्टी धारकांवर कारवाईचा बडगा उगारत नळकनेक्शन बंद केले आहेत. या धडक कारवाईने थकित करदात्यांचे धाबे दणाणले आहेत.
३१ मार्च रोजी आर्थिक वर्षे संपत आहे. ज्या करदात्यांनी अद्यापही घरपट्टीसह पाणीपट्टी भरणा केली नसल्यास तातडीने भरणा करावी. यासाठी ३० व ३१ मार्च रोजी नगर परिषद कार्यालय कराची रक्कम स्वीकारण्यासाठी खुले राहणार आहेत. थकित कराची रक्कम ३१ मार्चपूर्वी नगर परिषद कार्यालयात भरणा न केल्यास नगर परिषद अधिनियम १९६५ कलम १५०-१५०-अ नुसार प्रति महिना २ टक्के म्हणजेच वार्षिक २४ टक्के दंडाची आकारणी केली जाणार आहे. यात कुठल्याही प्रकारची सुट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.