ट्रेक क्षितिज’ या संस्थेचा पुढाकार ,गिर्यारोहकांसाठी उपयुक्त
देवेंद्र जाधव l खेड :गिर्यारोहणाची अधिकाधिक माहिती महाजालावर उपलब्ध होऊ लागल्यावर हौशी गिर्यारोहकांकडून स्वतःच्या समूहासोबत भटकंतीला जाण्याचे प्रमाण वाढू लागले. काही वेळा महाजालावरील फोटो पाहून, व्हिडीओ पाहून भटकंतीच्या योजना आखल्या जातात. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध नसते आणि वाटा चुकण्याची, भरकटण्याची भीतीही असते. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील रसाळगड, सुमारगड, महिपतगड आणि पालगड या चार किल्ल्यांचे नकाशे ‘ट्रेक क्षितिज’ या संस्थेने जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केले आहेत. या चारही किल्ल्यांचे नकाशे गिर्यारोहण मार्गासह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे झाल्याच्या निमित्त राज्यभरात विविध उपक्रम होत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून हे परिपूर्ण नकाशे तयार करण्यात आले आहेत. रसाळ, सुमार, महिपत या किल्ल्यांची भ्रमंती
गिरीमित्रांचा कस लागतो या गिर्यारोहणादरम्यान सह्याद्रीतील जावळी खोऱ्याचा दुर्गम भाग अनुभवायला मिळतो. या तीनही किल्ल्यांचे सप्रमाण नकाशे कुठेही उपलब्ध नव्हते. हा गिर्यारोहणाचा मार्ग संपूर्णपणे राखीव जंगलातून जात असल्याने त्याचा दिशादर्शक नकाशाही अस्तित्वात नव्हता. त्यामुळे गिर्यारोहक अनेकदा वाट चुकून भरकटण्याचे प्रकारही घडले होते. यासाठी हे सप्रमाण नकाशे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यावर ‘ट्रेक क्षितिज’ने राज्य सरकारच्या गड-किल्ले संवर्धन समितीचे कोकण विभागातील सदस्य आणि इतिहास अभ्यासक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबरच्या
दुसऱ्या आठवड्यात या किल्ल्यांची भ्रमंती करून जीपीएस यंत्रणा वापरून अचूक नोंदी केल्या.
महिपतगडाचा विस्तार १२० एकरांचा आहे. मात्र या किल्ल्यावर कोणते अवशेष, कुठे आहेत, त्यांच्यापर्यंत जाण्याच्या वाटा माहीत नसल्याने त्या अवशेषांपर्यंत गिर्यारोहक पोहोचत नाहीत, असेही आढळले होते. यासाठी जीपीएसच्या माध्यमातून उपलब्ध होणारी माहिती मार्गदर्शक ठरणार आहे. कुशल देवळेकर आणि महेंद्र गोवेकर यांनी जीपीएस यंत्रणा वापरून किल्ल्यांवरील वास्तू, अवशेष, बुरुज, मंदिरे इत्यादींच्या नोंदी घेतल्या असून महिपतगड ते सुमारगड ते रसाळगड या संपूर्ण गिरीभ्रमणाच्या मार्गाचे सर्व महत्त्वाचे टप्पे अक्षांश-रेखांशाच्या सहाय्याने निश्चित केले.
सह्याद्रीमधील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कदम यांनी सांगितले. असे इतर किल्ल्यांचे नकाशे गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी तयार करावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष दीपाली सबनीस यांनी केले आहे.