वाहनचालकांसह पादचारी त्रस्त, सातत्याने घडताहेत अपघात
खेड(प्रतिनिधी) खेड-भरणे मार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर सुरू आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाईसाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने फावत आहे. ही मोकाट जनावरे कोणत्याही क्षणी मार्गात आडवी येत असल्याने सातत्याने अपघात देखील घडत आहेत. मात्र, तरीदेखील मालकांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खेड-भरणे मार्ग पादचाऱ्यांच्या रेलचेलीने सतत गजबजलेला असतो. भर रस्त्यातच मोकाट जनावरे बस्तान ठोकत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे वाहतूक कोंडी देखील होवून वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याशिवाय मोकाट जनावरे कोणत्याही क्षणी मार्गात आडवी येत असल्याने सातत्याने अपघात देखील घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी मार्गात आडव्या आलेल्या बैलामुळे एका तरुणाला हकनाक प्राण देखील गमवावा लागला होता. मात्र तरीदेखील मार्गावर मोकाट जनावरांचा उपद्रव सुरूच आहे.
मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असतानाही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. याचा त्रास वाहनचालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या मोकाट जनावरांमुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.









