खेड (प्रतिनिधी) शिमगोत्सवासाठी तालुक्यात हजारोंच्या संख्येने पुणे, मुंबई तसेच अन्य ठिकाणांहून चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यांना आता परतीचे वेध लागल्याने
प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानक भरून गेले होते. सलग तीन दिवस सुट्टी असल्याने येथील बसस्थानक पुन्हा गजबजले .
प्रवाशांच्या मागणीनुसार व्यवस्थापनाने मुंबई मार्गावर दोन फेऱ्या जादा सोडण्यास सुरूवात केली आहे. बोरिवली, नालासोपारा, ठाणे, कल्याण, आंबेजोगाई, लातूर, चिंचवड, कोल्हापूर, स्वारगेट आदी मार्गावर धावणाऱ्या २६ नियमित फेऱ्यांसह ९ जादा बसेस चालवल्या जात आहेत.
प्रवाशांच्या मागणीमुळे आता आणखी दोन जादा बसेसची भर पडली असून ३१ मार्च पर्यंत बसस्थानकातून रोज सकाळी ११ वा. खेड- विठ्ठलवाडी जादा बस व रोज सकाळी १०.१५ वा. खेड-बोरिवली जादा बस सुटणार आहे. आगारात सद्यस्थितीत नादुरूस्त बसेस नसल्या तरी पूर्वीच्या काही कारणास्तव रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर न सोडण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला आहे.









