रेल्वे प्रवासात रत्नागिरी स्थानकादरम्यान नागपूरच्या महिलेचा मोबाईल लांबवला; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी | प्रतिनिधी : रेल्वे प्रवासादरम्यान महिलेचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 29 मार्च रोजी मध्यरात्री 2.45 वा. रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली.
याबाबत श्वेता संदिप मुळे (41,रा.त्रिमृर्ती नगर,नागपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी त्या नागपूर स्पेशल एक्सप्रेसने गोवा ते नागपूर असा प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपला सॅमसंग कंपनीचा मोबाईल चार्जिंगला लावला होता. मध्यरात्री 2.45 वा. त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनला थांबली असता त्यांना जाग आली. तेव्हा त्यांना चार्जिंगच्या ठिकाणी आपला मोबाईल दिसून आला नाही. त्यांनी आजुबाजुला मोबाईलचा शोध घेतला परंतू मोबाईल मिळून न आल्याने त्यांनी नागपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिथून ऑनलाईन पध्दतीने हा गुन्हा शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.