पोसरेच्या ग्रामस्थांची पाणीटंचाईची चिंता मिटली

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील पोसरे येथील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईला समोरे जावे लागत होते. उन्हाळ्यात मैलोन्मैल पायपीट करून तहान शमवावी लागत होती. शासन दरबारी खेटे घालूनही प्रशासनाने दादच दिली नव्हती. अखेर दक्षिण आफ्रिया येथे वास्तव्यास असलेल्या पोसरे गावचे रहिवासी हबीबा हमदुले यांनी पुढाकार घेत विंधन विहिरीची उपलब्धतता करून दिली आहे. यामुळे वर्षानुवर्षे ग्रामस्थांना सतावणारी पाणीटंचाईची समस्या कायमचीच संपुष्टात आली आहे.
पोसरे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी अक्षरशः वणवणच करावी लागत होती. पाण्यासाठी अवघा दिवस वेचताना शेतीच्या मशागतीची कामे उरकायची कधी, असा प्रश्न देखील सतावत होता. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवून देखील पदरी मात्र निराशाच पडली होती. अखेर सामाजिक कार्यकर्ते शाहिद खेरटकर यांनी ही बाब काही दानशूर व्यक्तींच्या निदर्शनास आणून देत पाणीप्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने साकडे घातले. त्यानुसार रऊफ वांगडे, लियाकत खतीब, डॉ. इसाक खतीब, जफर कटमाले यांनी पुढाकार घेत ही बाब हमदुले कुटुंबियांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार हमदुले कुटुंबियांनी याची गंभीर दखल घेत सतावणारा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विंधन विहीर खोदून दिली. या विंधन विहिरीला मुबलक प्रमाणात पाणीही लागल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाईची समस्यां कायमची दूर झाल्याने दिलासा मिळाला आहे.