विजयदुर्गचे भाजपचे कट्टर कार्यकर्ते शाहिद धोपावकर यांचे अपघाती निधन

विजयदुर्ग | प्रतिनिधी : विजयदुर्ग येथील भाजपचे कट्टर कार्यकर्ते शाहिदभाई धोपावकर यांचे काल विजयदुर्ग देवगड दरम्यान मोटारसायकल अपघातात दुर्दैवी निधन झाले. दुपारी देवगड येथून आपल्या मोटारसायकलने ते विजयदुर्ग येथे निघाले. दरम्यान, कोंडांबा येथील वळणावर त्यांच्या गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रूग्णालयात हलविण्यापुर्वीच त्यांचे निधन झाले.

ते ६९ वर्षाचे होते. शाहिदभाई हे विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे तीन वेळा सदस्य, एकदा उपसरपंच तसेच प्रभारी सरपंच, तीन वेळा गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला. अतिशय मितभाषी आणि सर्व जाती धर्मीयांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध होते. आपल्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विषय सामंजस्याने निकाली लावले. राजकारणातील माणूसकी जपणारा माणूस म्हणून ख्याती असलेल्या शाहिदभाई धोपावकर यांचे आकस्मिक अपघाती निधनाने संपूर्ण विजयदुर्ग गावात हळहळ व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा चिटणीस अरिफ बगदादी यांचे ते साडू होत.