विकास करायला नुसती दृष्टी नाही तर डोळसपणा लागतो : ना. नारायण राणे

मला आजवर मिळालेली पद केवळ मेरीटवर

जिल्ह्यातील लोकांसाठी पदांचा उपयोग व्हावा हाच माझा दृष्टिकोन

दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मिळणार समाधान शब्दांत अवर्णनीय

सावंतवाडी । प्रतिनिधी : केंद्रात मंत्री असलो तरीही माझं लक्ष हे नेहमीच माझ्या जिल्ह्यावर असतं. कारण मी आज जो काही आहे तो येथील जनतेच्या आशीर्वादामुळे व प्रेमामुळेच आहे.त्यामुळे माझ्या पदांचा उपयोग माझ्या जिल्ह्यातील लोकांना व्हावा त्यांचं जीवन समृद्ध व्हावं यासाठीच मी नेहमी प्रयत्नशील असतो. महाराष्ट्रातील कर्तबगार मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेता म्हणून आजही माझं कौतुक होतं. कारण विकास हाच माझा नेहमी ध्यास राहिला आहे. विकास करताना नुसती दृष्टी असून चालत नाही तर डोळसपणा लागतो, असे मत केंद्रीय  मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर उपस्थित पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास चर्चा केली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक महेश सारंग, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, १९९० साली मी या जिल्ह्यात आलो त्यावेळी या जिल्ह्याच दरडोई उत्पन्न केवळ ४० हजार होत. आज ते अडीज लाख आहे‌. गोवा, सिक्किम, तमिळनाडू दरडोई उत्पन्नात आपल्यापेक्षा पुढे आहे. येत्या काळात आपल्यालाही ते साडेतीन लाखांपर्यंत पोहचवायचे आहे. त्यासाठी या जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारांना व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आमचा प्रयत्न राहिला आहे. आज अनेक तरुण-तरुणी स्वयंरोजगाराकडे वळले आहेत. नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यांना आर्थिक व मानसिक बळ देणे हे आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींचा काम असतं. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असावा लागतो, असेही ते म्हणाले.

माझा जन्म वरवडे सारख्या दुर्गम भागातील सर्वसामन्य शेतकरी कुटुंबात झाला. वडील मुंबईत गिरणी कामगार होते आजारपणानंतर ते गावी आले. त्यानंतर रात्रीची शाळा शिकून मी शिक्षण पूर्ण केलं. आयकर विभागात नोकरी केली. त्यानंतर नगरसेवक,बीएसटी चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, विधान परिषदेचा आमदार, राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं मी आजवर  भुषविले. मात्र, कोणतही पद मागितलं नाही. मला जी पद मिळाली ती मेरीटवर मिळाली. व्यवसायात देखील मी कष्टातून पुढे आलो आहे. त्यामुळेच कुणाचही घर पेटविण्याचा वाईट विचार केला नाही. याउलट ज्यांनी माझं घर जाळलं त्यांनाही माफ केलं. दुश्मनी ठेवली नाही. यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, असं ही ते म्हणाले.

विधानसभेत व आता राज्यसभेतही मी नेहमीच सर्व प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. नारायण राणे निरुत्तर होणं हे शक्यच नाही. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा व नंतरच बोलावे. जग फार मोठं आहे. सर्व ज्ञान आत्मसात करणं कठीण आहे. मात्र, मला जेवढं शक्य होईल तेवढं नेहमीच आत्मसात करतो. मिळालेल्या ज्ञानाचा व पदाचा उपयोग जिल्हातील लोकांसाठी कसा करता येईल याचा प्रयत्न असतो. केवळ पैशानेच आनंद मिळतो असं नाही. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मिळणार समाधान शब्दांत सांगता येणार नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांनी आजवर केवळ माझ्यावर टीका करण्याचं काम केलं. चांगल्याला चांगलं म्हणायलाही मनाचा मोठेपणा लागतो. मी या जिल्ह्यात अनेक सुविधा आणल्या. इंजीनियरिंग कॉलेज, मेडीकल कॉलेज सुरु केलं.  जिल्ह्यातील लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पडवे येथे अडीचशे कोटीचं अद्ययावत हॉस्पिटल सुरु केलं. अमेरीका आणि जर्मनीच्या मशीनरीस या रूग्णालयात उपलब्ध आहेत. कोरोना काळात या रुग्णालयात अनेक रूग्णांवर मोफत औषधोपचार केले. मेडिकल कॉलेज देखील दर्जेदार असचं आहे. या उलट जिल्ह्यात सुरु केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दुरावस्था झाली आहे. मात्र, तेथे देखिल चांगल्या सुविधा देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या प्रकृतीवरून विरोधक खालच्या पातळीवर टीका करत आहेत. मात्र, माझी प्रकृती ठणठणीत आहे. विरोधकांनी त्याची काळजी करू नये. दिवसातून १८ तास मी काम करतो. नियमीत वाचन करतो. जगभरातील विविध महान व्यक्तींची आत्मचरित्र वाचणं हा माझा छंद आहे. विकासाच्या विषयावरील वाचनही मी नियमीत करत असतो. अर्थशास्त्राचा अभ्यास हा माझा आवडता विषय आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून विधानसभेतील माजी अनेक गाजलेली भाषणं पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. माझी इतरही अनेक पुस्तक प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे विरोधात बोलणाऱ्यांनी एक दिवस माझ्यासोबत राहून काम करून दाखवावं, असही ते म्हणाले.

माझ्या खात्याच्या माध्यमातून ओरोस येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याच भुमिपूजन झालं असून लवकरच त्याच काम पुर्ण होईल. या ठिकाणी विविध यंत्रसामुग्रींबाबत व प्रक्रिया उद्योगांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात नवं उद्योजक तयार होत आहेत. त्यांनाही येथे प्रशिक्षण मिळेल. तसेच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे देशातील पहिला मेडिसिन इक्विपमेंट तयार करणारा कारखाना येणार आहे. त्याचप्रमाणे इतर पाचशेहून अधिक उद्योग आणण्याचा मानस आहे. ओरोस येथे प्रशिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना याच ठिकाणी रोजगार मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.

माझ्याविषयी चांगलं बोलणं हा केसरकरांच्या मनाचा मोठेपणा : नारायण राणे

शिक्षणमंत्री दीपक केसरकर माझ्याबद्दल चांगलं बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते चांगलं बोलतात म्हणजे माझे ग्रह बदलले असं म्हणाव लागेल अशी मिश्किल टीपण्णी राणेंनी केली. केसरकरांबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. राजकारणात कधीही कुणी कायमचा दुश्मन नसतो. वैचारिक मतभेद असू शकतात. मी कधीही वैयक्तिक दुश्मनी ठेवली नाही. जो आपल्याला मदत करतो त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा रहाणार असं मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्याविषयी बोलताना व्यक्त केल.