कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जावे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कुडाळ येथे भाजपचा संपन्न झाला कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा

कुडाळ | विलास कुडाळकर :ही निवडणूक महत्त्वाची आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी अतिआत्मविश्वास न दाखविता प्रत्येक मतदारापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या योजना सांगा असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन करून १९९० पासून या जिल्ह्यामध्ये विकासाला दिशा देण्याचे काम मी केले आहे. या जिल्ह्यामध्ये सिंचन प्रकल्प असो किंवा घरापर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी, शाळा, रुग्णालय उभारण्याचे काम केले आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यापैकी एक तरी काम गेल्या १० वर्षात उबाठा शिवसेनेचे खासदार, आमदार यांनी केले आहे का? असा सवाल उपस्थित केला.

 

कुडाळ येथे भाजपचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाला यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे कुडाळ- मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, रणजीत देसाई, महिला मोर्चाच्या दीपलक्ष्मी पडते, राजू राऊळ, दादा बेळणेकर, चारु देसाई, दिनेश साळगावकर, प्रकाश मोर्ये, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, विकास कुडाळकर, बंड्या सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा स्वाभिमान आणि अभिमान वाढवला आहे. प्रत्येक घटकापर्यंत त्यांनी विविध प्रकारे योजना दिल्या आहेत. उद्योग क्षेत्रातही त्यांनी चांगल्या प्रकारे अर्थसंकल्पात तरतूद केली. त्यामुळे कोरोना काळात उद्योजकांना उभे करता आले. माझ्या उद्योग खात्याला दिलेल्या अर्थसंकल्पापैकी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला यावर्षी तर ९९.९५ टक्के एवढा खर्च झाला आहे नव्या उद्योजकांना उभे करण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. माझ्या जवळ असलेल्या खात्याची कामगिरी पाहून देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान व अर्थमंत्री यांनी कौतुक केले आहे. मात्र विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत असे सांगून १९९० पासून या जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक पायाभूत सुविधा देण्याचे काम केले आहे. पण निवडणुका आल्या की कोणत्यातरी मुद्द्यावरून विरोधक लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतात असे सांगून कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वास न दाखवता प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन दिलेल्या योजनांची माहिती देणे आवश्यक आहे आता महिनाभर पायाला चाक लावून कार्यकर्त्यांनी फिरावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

आत्ता डोकी भडकवणारे केले जाणार कृत्य:- माजी खासदार निलेश राणे

 

यावेळी कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की यावर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी करोडो रुपयांचा निधी आला आहे या निधीमधून अनेक विकास कामे होणार आहेत असे सांगून आता विरोधक डोकी भडकवणारी भाषणे आणि कृत्य करणार आहे मात्र कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या या कृतीला प्रतिसाद न देता शांततेत आपले काम करणे गरजेचे आहे मी सुद्धा आता याकडे लक्ष देणार नाही. आमचा लक्ष कसा विचलित करून जनतेत आमच्याबद्दल गैरसमज निर्माण कसे होतील हे विरोधक पाहणार आहेत. आतापर्यंत जनतेत अशा प्रकारच्या गैरसमजाचे वादळ उठवून निवडून आले आहेत गेल्या दहा वर्षात कोणतीही विकास कामे यांच्या हातातून झाली नाही उलट विकास कामांना विरोध करणे एवढीच कामे त्यांनी केली आहेत. या ठिकाणचे आमदार स्वतःला निष्ठावंत समजतात पण ते खरे निष्ठावंत नाही शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे किती वेळा ते गेले आहेत आणि त्यांनी कामे करून घेतली आहेत जर हे खोटे असेल तर त्यांनी कुडाळेश्वर मंदिरात यावं आणि सांगावं की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पक्षप्रवेशासाठी गेलो नव्हतो का? असेही त्यांनी यावेळी सांगितले.