बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोलगावचे दोघे संशयित ताब्यात

गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

बांदा पोलीसांची कारवाई

बांदा | प्रवीण परब : गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३२ हजार रुपयांची दारू व सुमारे ७ लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी विराज लक्ष्मीकांत वाडकर (२०, रा. कोलगाव काजरकोंड) व प्रशांत कोठावळे (रा. कोलगाव मारुती मंदिर जवळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो (एमएच ०९ गज १०५४) ताब्यात घेण्यात आला. सदर कारवाई इन्सुली चेकपोस्टवर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

सदर संशयित टेम्पोच्या हौद्यात दारू वाहतुकीसाठी स्पेशल चोरकप्पा तयार करून त्यातून दारू वाहतूक करीत होते. संशयित विराज वाडकर याने प्रशांत कोठावळे याच्या सांगण्यावरून बेकायदा दारू वाहतूक केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार विराज वाडकर व प्रशांत कोठावळे यांच्या विरोधात बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद चंद्रशेखर मुणगेकर यांनी पोलिसात दिली.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर बर्डे, पोलीस हवालदार चंद्रशेखर मुणगेकर, रामचंद्र तेली, सिद्धार्थ माळकर, सीताकांत नाईक व पोलीस नाईक तुषार वाघाटे यांच्या पथकाने केली.