खेड(प्रतिनिधी) तालुक्यात रणरणत्या उन्हाने कहर केला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक घामाघूम होत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील नद्या- नाल्यांसह विहिरी कोरड्या पडत चालल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू आहे. रखरखत्या उन्हामुळे बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीसह नारिंगी नदीपात्रही तळ गाठत असल्याने पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. यामुळे पाणीप्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो. अतिवृष्टीमुळे जगबुडी व नारिंगी नद्या दुथड्या भरून वाहतात. एकीकडे पावसाळ्यात नेहमीच ओव्हरफ्लो होणाऱ्या जगबुडी व नारिंग नद्या उन्हाळ्यात मात्र तळ गाठतात. सद्यस्थितीत दोन्ही नद्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे.
शेतकरीही जनावरांना पाणी पाजण्यासाठी याच नदीपात्राचा वापर करतात. मात्र सद्यस्थितीत दोन्ही नदीपात्रांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने सारेजण कोंडीत अडकले आहेत. उन्हाचा कहर सुरू असल्याने येत्या काही दिवसात दोन्ही नदीपात्रातील जलस्रोत आटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आगामी काळात पाणीप्रश्न अधिक गंभीर बनणार आहे.









