पंधरा वर्षांनंतर स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडला 

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

खेड (प्रतिनिधी ) – तब्बल 15 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले खेड शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक नाट्यगृह पुन्हा एकदा खेडवासीयांच्या सेवेत सुरू झाले आहे. याचे औपचारिक लोकार्पण रविवारी, 27 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

या नाट्यगृहाचे विशेष महत्त्व असे की, सन 1999 मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री रामदास कदम यांनी खेडवासीयांसाठी हे नाट्यगृह उभारले होते. मात्र सुमारे 2007 पासून हे बंद अवस्थेत होते. 2009 नंतर राज्यातील सत्ता बदल, मतदारसंघांचे पुनर्रचना आणि स्थानिक प्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या सांस्कृतिक केंद्राच्या दुरवस्थेकडे कोणी लक्ष दिले नाही. मनसेच्या वतीने “भीक मागो” आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही या ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.

 

मात्र 2019 मध्ये दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी या नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून घेतले. त्यांनी सतत पाठपुरावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यानंतर नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि 2022 पासून या नाट्यगृहाचे दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरू झाले.

 

या नाट्यगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र नसून कोकणातील कलावंत, विद्यार्थी, आणि सामाजिक संस्था यांच्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. आधुनिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज असे हे नाट्यगृह नव्याने कार्यान्वित झाल्यामुळे खेड शहराला सांस्कृतिक उर्जेसह एक नवे रूप मिळाले आहे.

 

या विशेष सोहळ्याचे औचित्य आणखी विशेष होते कारण याच दिवशी शिवसेना नेते रामदास कदम यांचा ७३ वा वाढदिवस होता. त्यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेले नाट्यगृह त्यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू होणे ही एक भावनिक आणि ऐतिहासिक बाब ठरली.

 

खेड तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, “हा फक्त सांस्कृतिक विकास नव्हे तर खेडच्या गौरवशाली परंपरेला पुन्हा उजाळा देणारा क्षण आहे,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.