दापोली | प्रतिनिधी: मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव येथे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिनांक 7 एप्रिल रविवारी रोजी ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला येथील मानस हॉटेल समोर आली असताना हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व स्थानिकांच्या बरोबर तात्काळ मदत कार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय नारायण वरंदेकर-५६, प्रवीण अनंत मालसुरे-५५ व गणेश बाबु जाधव-५४ या तिनही प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. . घटनेची माहिती एस.टी.बसचालक दिलीप येवले यांनी माणगांव पोलिस स्थानकात दिली असुन माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या भीषण दुर्दैवी अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू आहे.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव परिसरात यापूर्वीही मोठे अपघात झाले आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या मोठ्या अपघातात हेदवी येथील एकाच घरातील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे अनेकदा ट्रॅफिक जाम होण्याचे ही अनेकदा प्रकार घडत आहेत.












