पेडणे (प्रतिनिधी) : मोपा येथील माहेरवाशिणीचा देव अशी ख्याती असलेल्या श्री गिरोबा देवाचा वार्षिक उत्सव मंगळवार ९ एप्रील रोजी साजरा होत आहे. गावातील चव्हाट्यावर होळी पौर्णिमेच्या दिवशी घातलेल्या होळीला कापून त्यापासून गिरोबाची मुर्ती तयार करुन हा उत्सव साजरा केला जातो.
त्यानिमित्त सकाळी होळीची विधीवत पुजा होईल. त्यानंतर तोर्से येथील च्यारी कुटुंबियांकडून ती होळी ठरावीक उंचीच्या अंतरावर कापुन तीची श्री देव गिरोबा देवाची आकर्षक मुर्ती तयार केली जाईल. नंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व विविध धार्मिक विधी झाल्यावर पूजा, आरती व तीर्थप्रसाद होईल. त्यानंतर नवस बोलणे व फेडण्याचा कार्यक्रम होईल.
दुपारी ४ वाजता देवाला अर्पण केलेल्या विविध वस्तूंची पावणी कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ वाजल्यापासून अन्य सर्व भाविकांना देवदर्शन सुरु होईल. रात्री १० वाजता तरुण हौशी नाट्य मंडळ मोपा यांचा ‘संगीत जय चंडी’ हे नाटक होईल. नाटकाचे दिग्दर्शन सिद्धेश परब तर संगीत दिग्दर्शन दिगंबर गाड यांचे आहे.
सदर नाटकात उमेश नाईक, प्रकाश नाईक, संदेश नाईक, शांताराम पालव, प्रसाद परब, प्रथम परब, गिरीश परब, अभी सांवंत, राजेद्र नाईक, महादेव परब, रुपेश सावंत, खेमराज राउळ, आरती परब, स्वानंद नाईक, आयुष नाईक, आर्यन परब, चंदन नाईक, तुकाराम नाईक, लक्षीत प्रवीण गाड आदी कलाकार आहेत. संपूर्ण सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.












