रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरात प्रेमसंबंधातून एका तरुणीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भक्ती जितेंद्र मयेकर (वय 26, रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) या तरुणीचा तिच्या खंडाळामधील प्रियकराने आंबा घाटात खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गेल्या 13 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, संशयित प्रियकराला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भक्ती मयेकर आणि खंडाळामधील एका तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी या तरुणाचे लग्न ठरले. त्याचे होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो पाहिल्यानंतर भक्ती व संशयित यांच्यात वाद सुरू झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, याच वादातून संशयित प्रियकराने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर दोघे आंबा घाटाकडे गेले. तेथे पुन्हा वाद झाल्यानंतर संशयिताने रागाच्या भरात तिचा खून केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भक्ती 17 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती न मिळाल्याने 21 ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता, तिचा खंडाळा येथील प्रियकराशी संबंध असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने संशयिताला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
यानुसार शनिवारी दुपारी स्थानिक पोलीस व गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंबा घाटाकडे धाव घेतली. तेथे मृतदेहाचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत राजू काकडे हेल्प अकॅडमी स्वयंसेवकांनीही मदत केली. सायंकाळपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
या प्रकरणात आणखी काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिस अधिक तपास करत आहेत.










