रेडिमेड गुढी खरेदी करण्याची क्रेझ वाढली

खेडमधील मालशे कुटुंब साकारतेय आकर्षक गुढ्या; दरवर्षी मागणी वाढतेय
खेड (प्रतिनिधी)
हिंदू नववर्ष आरंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. गेल्या काही वर्षात आकर्षक गुढ्या उभारण्याकडे कल वाढला असून,  खेड येथील मालशे कुटुंब सणासाठी रेडिमेड गुढ्या तयार करण्यात गुंतले आहे. या तयार गुढ्या व त्यांचे सुट्टे भाग यांची मागणी दरवर्षी वाढत आल्याचे ते सांगतात.
हिंदू नववर्षारंभ गुढी पाडव्याला साजरे केले जाते. पारंपरिक पद्धतीने घरावर उंच बांबू वर वस्त्र लाऊन कलश ठेऊन गुढी उभारली जाते. कडुलिंबाचा पाला, साखरेपासून बनवलेली हलव्याची माळ, हार आदी साहित्य वापरून गुढी सजवली जाते. त्यासोबत गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांनी आकर्षक गुढ्या घर, ऑफिस तसेच दुचाकी व चारचाकीवाहनांमध्ये देखील उभारण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लहान शोभेच्या गुढ्या तयार करण्याचा एक हंगामी छोटेखानी गृह उद्योगाला देखील आता चालना मिळू लागली आहे.
खेड येथील शशिकांत ऊर्फ नाना मालशे व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडवा सण जवळ आला की विविध वस्तू हस्त कलेतून तयार करून त्या विक्रीसाठी बाजारात ठेवतात. त्यांनी तयार केलेल्या गुढ्या हलव्याचे दागिने, सजावटीच्या फुलांच्या माळा, मोत्याच्या माळा आदी साहित्य देखील यावर्षी बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. या साहित्यांना चांगली मागणी असल्याचे शशिकांत मालशे यांनी सांगितले.