खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील तळे मार्गावर पुलाचे काम चालू असल्याने व मंगळवारी झालेल्या पावसामुळे चिखल निर्माण झाल्याने येथील बसस्थानकातून सोडण्यात येणाऱ्या ६ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. रद्द फेऱ्यांमुळे मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा झाला.
बंद फेऱ्यांमध्ये बसस्थानकातून तळे मार्गावर सकाळी ९.३० वाजता सुटणारी कोसमवाडी, १०.३० वाजता घोगरे, ११.१५ वाजता रसाळगड, १२.३० वाजता घोगरे, १ वाजता झोळीचीवाडी, १.४५ वाजता किंजळे आदी बसफेऱ्यांचा समावेश आहे. रद्द फेऱ्यांमुळे गावाकडून शहरात येणाऱ्या व शहरातून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना स्थानकातच ताटकळत बसावे लागले. सायंकाळच्या बसफेऱ्यांतून इच्छितस्थळ गाठताना मनस्ताप सहन करावा लागला तर काही प्रवाशांनी आर्थिक भुर्दंड सोसत खासगी वाहनांचा आधार घेवून इच्छितस्थळ गाठणे पसंत केले.










