नववर्ष स्वागत समिती लांजाच्यावतीने लांजा शहरातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा

ढोल ताशांच्या गजरात, भगव्या झेंड्यानी संपूर्ण वातावरण भगवेमय

लांजा (प्रतिनिधी) गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समिती लांजा च्या वतीने मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ढोल-ताशांच्या गजरात लांजा शहरातून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेने संपूर्ण लांजा शहर दणाणून सोडण्यात आले. या शोभायात्रेत नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. महिला वर्गाने लेझीमवर ठेका धरत सार्यांचे लक्ष वेधून घेतले.

नववर्ष स्वागत समिती लांजा च्या वतीने दरवर्षी गुढी पाडव्याचे औचित्य साधून नववर्षाच्या स्वागतासाठी लांजा शहरातून भव्य स्वरूपात स्वागतयात्रा काढण्यात येते. अशाच प्रकारे मंगळवारी ९ एप्रिल रोजी लांजा गावचे जागृत ग्रामदैवत श्री धनी केदारलिंग येथून या शोभा यात्रेला सायंकाळी ५ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात ही शोभायात्रा नाईकवाडी मार्गे श्री पौलस्तेश्वर देव मंदिर, शेट्येवाडी ते पुन्हा लांजा शहरातून श्रीराम मंदिर अशी काढण्यात आली. या शोभायात्रेत लांजा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. वारकरी संप्रदाय देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता. तसेच भाजपा लोकसभा प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार हे देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेत असलेल्या भगव्या ध्वजानी संपूर्ण वातावरण हे भगवेमय होऊन गेले होते.

या शोभायात्रेत वीरशैव समाज लांजाचा देखावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज मावळे, भारत माता आदी देखावे हे विशेष आकर्षण ठरले. या शोभायात्रेने संपूर्ण लांजा शहर परिसराचा मोहोळ हा भगवामय करून टाकला होता. सायंकाळी ७.३० वाजता श्रीराम मंदिर येथे सांगता झाली.