गावखडीची ग्रामदेवता श्रीजाकादेवीची पालखी गुढीपाडव्यादिनी निघाली भक्तभेटीसाठी   

 

गावखडी l वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावची ग्रामदेवता श्रीजाकादेवीची पालखी शिमगोत्सवानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी गावखडी गावात भक्तिभेटीसाठी बाहेर पडली आहे .

गावखडीची ग्रामदेवता श्रीजाकादेवीची पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पालखी प्रथेप्रमाणे

श्रीदेव रामेश्वर मंदिर , स्थंबदेव या देवतांच्या भेटीनंतर गावचे इनामदार म्हणून व्यवस्थापन सांभाळणारे नंदकुमार नारायण गोरे यांच्याकडे देवीची पालखी जाते.यानंतर ब्राह्मणवाडी , तोडणकरवाडी , सुरकरवाडी , तरयेवाडी , , शिवगणवाडी ,सुतार वाडी , कुंभारवाडी , बंडबेवाडी , नानरकरवाडी , पवारवाडी , आदी वाड्यातून पुन्हा गुरववाडी मंदिरात स्थानापन्न होते.

या पालखीत जुगादेवी , मानूबाय , जाकादेवी , रामेश्वर या देवतांच्या मूर्त्या आहेत. या पालखी सोबत गावखडीतील प्रमुख मंडळी, भक्तगण, बारा वाड्यातील मान्यवर उपस्थित असतात. या देवीची पूजा , गाऱ्हाणे घालणे गुरव मंडळी करतात. गावखडीतील ग्रामदेवता जाकादेवी जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी आहे.त्यामुळेच मुंबई, पुणे ,राजापूर, येथून भक्तगण, माहेरवाशीण गुढीपाडव्याला देवीच्या दर्शनासाठी गावखडीत दरवर्षीच येतात. देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात घरोघरी भक्तिभेटीसाठी जात आहे.सर्वत्र भक्तिमय वातावरणात जणू काही नवीन वर्षाचे स्वागत गावखडीतील ग्रामस्थ भाविक करीत आहेत.