राजवाड्यातील कला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर
सावंतवाडीत गंजिफाचे म्युझियम उभारणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींना गंजिफा भेट देणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : गंजिफा आर्ट असोसिएशन ऑफ सावंतवाडी संस्थेच्या गंजिफा कलेला भारत सरकारकडून जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडीच्या जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांनाही जी आय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक महत्व प्राप्त होणार आहे. सद्यस्थितीत काही निवडक कलाकारांच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम भविष्यात स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सौ. शुभदादेवी भोंसले यांनी दिली.
सावंतवाडी संस्थांच्या राजवाडा परिसरातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राजे खेमसावंत भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी
सौ. श्रद्धाराजे भोंसले, ॲड. समिक्षा दाभाडे आदी उपस्थित होते. हे जी आय मानांकन प्राप्त करण्यासाठी ॲड. समिक्षा दाभाडे यांनी नोव्हेंबर २०२२ ला प्रस्ताव सादर केला होता. तर सावंतवाडी लॅकर वेअर्स कंपनीच्या माध्यमातून त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर ६ जानेवारी २०२४ रोजी हे मानांकन जाहिर करण्यात आले असल्याची माहिती यावेळी ॲड. समिक्षा दाभाडे यांनी दिली.
गंजीफा कलेला जी आय मानांकन प्राप्त झाल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गंजिफाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सावंतवाडीच्या राजमाता श्रीमंत सत्वशीला देवी भोसले यांनी पुंडलिक चितारी यांच्या माध्यमातून गंजिफा कलेला राजाश्रय दिला. त्यानंतर सद्यस्थितीत २५ कलाकार ही कला वृद्धिंगत करीत आहेत. भविष्यात स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या माध्यमातून १२५ कलाकारांना सोबत घेऊन काम करायचा मानस आहे. तसेच मेक इन इंडियाच्या माध्यमातून चांगले कार्य करीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील गंजिफा भेट देण्याचा मानस असल्याचे यावेळी सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी सांगितले.
तर स्व. शिवराम राजेंनी जर्मनी येथे भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना गंजिफा कलेला प्रोत्साहन दिले होते. जपान जर्मनीमध्ये प्लेईंग कार्ड म्युझियम आहेत. त्या धर्तीवर आपल्याकडेही अशा प्रकारचे म्युझियम व्हावे ही राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले तसेच गोवर्धन दास यांची इच्छा होती. ही इच्छाही लवकरच पूर्णत्वास आणणार असून सावंतवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे गंजिफा म्युझियम उभारणार असल्याची माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली.
गंजिफा ही पुरातन लोककला असून तो देव खेळ आहे. पुराणातील विष्णूचे दहा अवतार असलेल्या दशावतारांच्या कथांचा या गंजिफामध्ये समावेश आहे. रामायण महाभारतातील कथाही पत्त्यांच्या माध्यमातून यात चित्रीत करण्यात आल्या आहेत. गंजिफा आज जरी विकत घेतला जात असला तरीही तो प्रत्यक्षात कसा खेळला जातो याबाबत अनेकांना माहिती नाही. त्यामुळे लवकरच राजेवाड्यात गंजीफा प्लेइंग वर्कशॉप घेण्यात येणार आहे. तसेच यू ट्यूब वर देखील गंजिफा खेळ प्रत्यक्ष कसा खेळावा त्याची माहिती व क्यू आर कोड देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सौ. श्रद्धाराजे यांनी दिली.
सावंतवाडीतील गंजीफा कलेच्या कामासाठी सध्या राजवाडा येथे २५ विविध कलाकार काम करीत आहेत. सावंतवाडीतील बांदेकर फाईन आर्ट महाविद्यालयाचे काही विद्यार्थीही या ठिकाणी अर्धवेळ काम करीत आहेत. देशविदेशातील काही प्रशिक्षणार्थी देखील या ठिकाणी येऊन ही कला शिकत आहेत. त्यामुळे या कलेला जरी जीआय मानांकनाच्या माध्यमातून संरक्षण मिळाले असले तरीही येथील कलाकारांच्या भवितव्यासाठी
केंद्र सरकारच्या हस्तकला विभागाच्या माध्यमातून त्यांच्या भविष्य निर्वाह निधी साठी
देखील प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी युवराज लखम राजे भोसले यांनी दिली.












