सावंतवाडी l प्रतिनिधी : कोलगाव येथील सावंत परिवाराच्या वतीने श्री देवी भवानी माताचा पारंपरिक जागरण गोंधळ उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव दिनांक २८ एप्रिल २०२६ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार असून परिसरातील भाविकांमध्ये याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता सर्व संचारांना हाक मारून देवीचा पाट बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता देवीचा मांड भरून दिवट्यावर तेल घालणे व नवस फेडणे असे विधी पार पडतील. रात्री ९ वाजता पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम सादर केला जाणार असून रात्री १०.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग रंगणार आहे.
त्यानंतर २९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता देवीचा पाट आत घेण्याचा विधी व ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण उत्सवासाठी समस्त सावंत परिवार, कोलगाव यांनी विशेष पुढाकार घेतला असून सर्व भाविकांनी सकुटुंब उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन सावतं परीवार च्या वतीने करण्यात आले आहे.











