जगबुडी किनारी गणेश विसर्जन घाटाची उभारणी

खेड(प्रतिनिधी) खेड जगबुडी नदीकिनारी सद्यस्थितीतील गणेश विसर्जन घाटाची जागा अपुरी पडत असल्याने आमदार योगेश कदम यांनी जगबुडी नदीकिनारी लगतच्या दुसऱ्या बाजूला गणेश विसर्जन घाटाची उभारणी करण्यांकरिता कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. नव्या गणेश विसर्जन कट्ट्याच्या कामासही प्रत्यक्ष प्रारंभ झाल्याने यंदा गणेशभक्तांची गैरसोय दूर होणार आहे.

शहरात गणेशोत्सवात स्थानापन्न होणाऱ्या १३ हजार हजार ७८६ गणेशमूर्तीसह १२ हून अधिक सार्वजनिक गणेशमूर्तींचे जगबुडी नदीपात्रात विसर्जन केले जाते. घाटालगत गणेश विसर्जन कट्ट्याची।देखील नगरप्रशासनाने उभारणी केली आहे. मात्र, तो कट्टा देखील अपुराच पडतो. गणेश विसर्जन घाटात आरत्या व इतर विधी करताना गणेशभक्तांची एकच झुंबड उडत असल्याने पुरेपूर काळजीच घ्यावी लागते. पर्यायाने सद्यस्थितीत घाटाच्या अपुऱ्या जागेमुळे गणेश विसर्जनाची प्रक्रिया देखील बऱ्याच वेळा लांबणीवर पडते. ही बाब आमदार कदम यांनी हेरत नव्या विसर्जन घाटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.