खेड(प्रतिनिधी) गेल्या चार-पाच दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी सकाळ पासून वाढला यामुळे जगबुडी , चोरद व नारिंगी नदी पात्रातील पाणी कमालीचे वाढले यातील जगबुडी नदी चे पाणी इशारा पातळी ओलांडून वाहत होते
. सकाळपासूनच धो-धो कोसळणाऱ्या पावसाने साऱ्यांचीच दाणादाण उडवली. पावसाच्या संततधारेने गेल्या दोन-तीन दिवसांपासून विस्कळीत झालेले जनजीवन बुधवारी देखील कायमच राहिले.
पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकरी कमालीचे सुखावले आहेत. पेरणी केलेल्या भात रोपांची रुजवात घेण्यास पावसाचा फायदा होत असल्याने बळीराजा आनंदित आहेत. काही ठिकाणी भात लावणीस देखील प्रारंभ झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. नारिंगी व जगबुडी नद्याही दुथड्या भरून वाहत आहेत. सांयकाळी जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडुन वाहत राहिल्याने नद्या काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे











