वेंगुर्ले येथील ज्येष्ठ कलाशिक्षण तज्ज्ञ व प्रशासक- पद्मश्री विष्णू ऊर्फ दादासाहेब नामदेव आडारकर

सिंधुदुर्गचे माणिकमोती l     डाॕ.बाळकृष्ण लळीत.

 

२०१४ साली एक वृत्त वाचनात आले ..’वेंगुर्लेचा नामदेव आडारकर ‘सिंधुदुर्ग केसरी’चा मानकरी-‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे येथे पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा ‘सिंधुदुर्ग केसरी’ स्पर्धा झाल्या मानाचा सिंधुदुर्ग केसरी २०१४ चा किताब वेंगुर्लेचा मल्ल नामदेव आडारकरने पटकावला.’

…हे वृत्त वाचल्यावर मला आनंद झाला.पण हा आनंद होण्यामागे आणखी एक कारण होते.ते म्हणजे मला या नावावरून भारतीय रिझर्व्ह बॕकेचे ९वे गव्हर्नर भास्करराव नामदेव आडारकर आठवले की जे नेहमी कोकणी -मालवणी बोलत. त्यांचे मोठे बंधू भैया आडारकर…तसेच ज्येष्ठ कलाशिक्षणतज्ज्ञ पद्मश्री विष्णू नामदेव आडारकर ऊर्फ प्रख्यात चित्रकार,कला शिक्षणतज्ज्ञ दादा आडारकर यांची कारकीर्द आठवली. समाजमाध्यमावर शोध घेतल्यावर ‘ विवेक -महाराष्ट्र नायक’सदरातील रंजना जोशी व दीपक घारे यांनी लिहिलेला एक लेख उपलब्ध झाला. या लेखाच्या आधारे यांचे कार्य कर्तृत्व समजावून घेऊया.

++

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आडाळी, आडेली,आडारी अशी नामसादृष्य असलेली गावे,वाड्या आहेत,पैकी आडाळी हे दोडामार्ग तालुक्यात येते,तर एक ‘आडारी’ मालवण जवळ आंगणेवाडीला जाताना वाटेत ‘कोळंब’नावाचे खाडीकाठी एक प्रसिद्ध गाव आहे… तेथेही ‘आडारी’ आहे,पण ती कोळंब गावची ‘वाडी’ आहे आणि देवगड जवळच्या मिठबांवला ही एक ‘आडारी ‘आहे.

++

‘वेंग मारून उरले ते’वेंगुर्ले…..!’

दक्षिण कोकणातील एक सागर किनाऱ्यावरील निसर्गरम्य,

प्रतिष्ठित आणि साहित्य ,

कला,सांस्कृतिक दृष्टीने मला नेहमीच अभिमान वाटतो.. असे गाव.वेंगुर्लेहून शिरोडा रस्त्याने जाताना लगेचच उजवीकडील ‘मानसीश्वर’ मंदिरानंतर साधारणपणे एक कि.मी. अंतरावर हेळेकर मंदिर लागते

उभा दांडा हेळेकर मंदिर कडून डाव्या बाजूने आडारी वाडी रस्त्याने आडारी वाडीत गेल्यावर उजव्या बाजूला प्राचीन श्री विठ्ठल मंदिर आहे, डाव्या बाजूला सुंदर प्रसिद्ध निसर्गरम्य “आडारी तलाव” आणि तलावाच्या काठावर श्री ब्राह्मण देव मंदिर आहे. तसेच देवी कुलस्वामिनीचे मंदिर आहे आणि जवळच ‘आडारकर’ आडनावाची कुटुंबे गेली अनेक वर्षे येथे वास्तव्य करून रहातात.यापैकी एक नामदेव आडारकर यांचे घर…या घरात आज आपण परिचय करून घेणार आहोत,त्या पद्मश्री विष्णू ऊर्फ दादा आडारकर यांचा २३ आॕगस्ट १९०८ या दिवशी जन्म झाला.भारतीय रिझर्व्ह बॕकेचे नववे गव्हर्नर भास्करराव त्यांचेच धाकटे बंधू…..!(जन्म १८मे१९१०) आणि सर्वात वडील बंधू भैया साहेब…सारस्वत बॕकेचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीरंग आडारकर हेही याच कुटुंबातील होत.’

++

*महाराष्ट्र राज्याचे पहिले कलासंचालक-*

विष्णू नामदेव ऊर्फ दादा आडारकर यांचा जन्म २३आॕगस्ट १९०८ रोजी वेंगुर्ले येथे झाला. शालेय शिक्षण घेतानाच उपजत असलेल्या चित्रकलेची आवड अधिक विकसित होत गेली. पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईत ‘जे. जे. स्कुल आॕफ आर्ट’ मध्ये प्रवेश मिळाला.शिक्षण घेताना अनेक पारितोषिके प्राप्त करणाऱ्या विष्णू यांनी १९३०साली रंगचित्रकलेतील पदविका मिळवली.

++

नंतर एका खाजगी संस्थेत नोकरी मिळवली.त्या काळात कोकणातून गेलेल्या प्रत्येक तरूणाला मुंबईत स्थीर होण्यासाठी थोडेसे शिक्षण घेतल्यावर नोकरी पत्करावीच लागत असे ;पण कलेच्या जन्मभूमीत जन्मलेल्या प्रत्येक तरूण नोकरीवर समाधान न मानता आपले ध्येय गाठवण्यासाठी पराकाष्ठा करत असे.१९३२ साली त्यांनी ‘टाईम्स आॕफ इंडिया ‘वृत्तपत्रात वरिष्ठ चित्रकार म्हणून काम पाहिले.त्यांची या क्षेत्रातील गुणवत्ता पाहून जेथे ते शिकले त्याच जे. जे. आर्ट स्कुलमध्ये उपसंचालक म्हणून निवृत्त झाले.

++

*लंडनला रवाना-*

इंग्रजी राजवटीत आपल्याला विलायतेला गेलेल्या राजकीय नेत्यांची नावे सहजपणे सांगता येतात पण अन्य क्षेत्रात ज्ञान प्राप्त करण्यासाठी असंख्य भारतीय तरूण युरोपकडे जात होते…पैकी एक विष्णू नामदेव आडारकर.१९४६ ते १९४७ ते इंग्लंडला होते. तेथे त्यांनी कला शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास केला व पुन्हा भारतात आले.

++

*विष्णू नामदेव आडारकर कलाशिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासक -*

यासंदर्भात रंजन जोशी व दीपक घारे यांनी एक अत्यंत कष्ट घेऊन लिहिलेला लेख उपलब्ध आहे.त्यात ते लिहितात-

“महाराष्ट्र राज्याचे पहिले कलासंचालक आणि उपयोजित कलाशिक्षणाचे प्रवर्तक विष्णू आडारकर हे कोकणातील वेंगुर्ले येथून चित्रकलेची आवड असल्याने मुंबईत आले आणि त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. जे. जे. मध्ये शिकत असताना त्यांना अनेक पारितोषिके मिळाली. १९३० साली त्यांनी रंगचित्रकलेतील (पेंटिंग) पदविका संपादन केली आणि एल.ए. स्ट्रोनॅक अँड कंपनी या जाहिरात संस्थेत ते रुजू झाले.

पुढे इंग्लंडहून आल्यावर १९४६ ते १९५८ या काळात उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) या विभागाचे ते प्रमुख होते. १९५८ मध्ये ‘सर जे.जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’ ही स्वतंत्र संस्था स्थापन झाली व १ जानेवारी १९६१ पासून या संस्थेचे अधिष्ठाता (डीन) म्हणून आडारकरांची नेमणूक झाली.”

या लेखात पुढे म्हटले आहे.. “महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर १९६५ मध्ये कलासंचालनालयाचे कलासंचालक (आर्ट डायरेक्टर) म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.ऑगस्ट १९६८ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले.१९६९ साली आय.आय.टी.पवई येथे आय.डी.सी.(इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) ची स्थापना झाली.पहिली पाच वर्षे आडारकर आयडीसीचे सल्लागार होते.”

“आडारकरांकडे कलेच्या बदलत्या स्वरूपाचा आणि तिच्या समाजाभिमुखतेचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि सर्वांना बरोबर घेऊन काम पूर्णत्वास नेण्याची हातोटी होती. प्रशासकीय अनुभवाबरोबरच सरकार दरबारी त्यांचे वजन होते.त्यामुळे जे.जे.चा उत्कर्ष झाला आणि कलावंतांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. शासकीय कलावंतांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. शासकीय योजना,सामाजिक विकासाबाबतची ध्येय-धोरणे यांचा प्रसार करण्यासाठी जे.जे.सारख्या कलासंस्थांचा उपयोग करून घेतल्यामुळे चित्रकारही समाजाचा क्रियाशील घटक बनले.१९३५ साली चार्ल्स जेरार्ड यांच्या कारकीर्दीत ‘कमर्शिअल आर्ट’चा विभाग सुरू झाला खरा; पण व्यावसायिक (कमर्शिअल) आणि नंतर उपयोजित (अप्लाइड आर्ट) विभागाचे संवर्धन आडारकरांनी केले.”

” याच काळात औद्योगिक उत्पादनांमुळे आडारकरांच्या काळात जाहिरात क्षेत्राचा विस्तार झाला,१९६० साली सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्या वर्षीच्या ‘शिल्पांजली ‘च्या विशेषांकात आडारकर यांनी ‘इंडस्ट्रिअल डिझाइन ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्याचा विचार मांडला होता. प्रत्यक्षात महाराजा सयाजीराव विद्यापीठ,बडोदा (वडोदरा)आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एन.आय.डी) येथे अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू झाले.त्यानंतर मुंबईतआडारकरांच्या पुढाकाराने आय.डी.सी.सेंटर सुरू झाले.या कलाशिक्षणाच्या विकासात आडारकरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता.

आज जो दृक्-संवादकलेचा जाहिरातकला,उपयोजित कला, संकल्पन (डिझाइनिंग)अशा क्रमाने विस्तार झाला आहे, त्याला पूरक अशा कलाशिक्षणाचा पाया विष्णू आडारकर यांनी घातला.आडारकर इंग्लंडला जाऊन आल्यानंतर कला शिक्षण (आर्ट एज्युकेशन) या विषयावर त्यांनी लिहिलेला अहवाल शासनातर्फे प्रकाशित करण्यात आला.सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड डिझाइन, लंडन येथे ते पहिले ‘ऑननरी लाइफ फेलो’ होते.” (साभार-रंजन जोशी -दिपक घारे.यांचा लेख )

++

१९६५ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला. मुंबईत १३मे १९९४ साली त्यांचे निधन झाले.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दादा आडारकर यांनी काढलेली काही चित्रे समाजमाध्यमावर उपलब्ध आहेत.

*जाता .. जाता..-*

…अनेकांना हे माहिती नसेल विष्णू ऊर्फ दादा यांची आते म्हणजेच वडील नामदेव आडारकर यांची चुलत बहिण तापीबाई या बॕ.नाथ पै यांच्या मातोश्री होत.वडील नामदेवराव महात्मा गांधींचे अनुयायी होते. शिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात एका तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले होते …!

वाचकहो ..!हे कदाचित साधे- साधे संदर्भ देऊन मी आपला वेळ ‘खात’आहे हे मला समजते.. तरी पण या माहितीला त्या काळाचा विचार केला तर फार महत्त्व आहे.असे मला वाटते.

याच आडारी वाडीत जन्मलेले बी. पी.आडारकर यांचा पं.नेहरूंची परिचय होता.अर्थशास्त्राचे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथ त्यांनी लिहिले.. या सर्व आडारकर मंडळींवर एक ग्रंथ तयार होईल..!

( लेखात काही संदर्भ चुकले तर अवश्य लक्षात आणावेत. ही नम्र विनंती)

————————————-

संदर्भ –

१. रंजन जोशी व दीपक घारे यांचा लेख (विवेक महाराष्ट्र नायक)

२. विशेष आभार- श्री.बाळा कुडाळकर,मा.मधुसुदन साळगावकर.