खेडमध्ये पाणी टंचाई चा दाह, सुसेरी-देवसडेत धावला पहिला टँकर

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील तहानलेल्या ग्रामस्थांची अखेर टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. तालुक्यात सुसेरी-देवसडे येथील ५ वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर धावल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल करून महिनाभराचा कालावधी लोटूनही अद्याप ४ गावातील ५ वाड्या अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. चिरणी-ढेबेवाडी, फुरूस येथील ११ वाड्यांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे.
खोपी-अवकिरेवाडी, मानेवाडी येथील ग्रामस्थांचा टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्ज प्रशासनाकडे दाखल झाला होता. मात्र येथील ग्रामस्थ अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत प्रशासनाला दाखले प्राप्त न झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले होते.

अखेर दिवाणखवटी-सातपानेवाडी व सुसेरी- देवसडेतील सावंतवाडी, वैरागवाडी, जाधववाडी, मधलीवाडी आदी गाव-वाड्यांचे दाखले प्राप्त झाल्याने येथे पाण्याचा टँकर धावणार होता. मात्र काही कारणास्तव दिवाणखवटी-सातपनेवाडी येथे अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या वाढत आहे. चिरणी-ढेबेवाडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. यामुळे ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या पाठोपाठच फुरूस येथील ११ वाड्यांतील ग्रामस्थांनी टँकरसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या गाव-वाड्यांचे सर्वेक्षण करून दाखले प्राप्त झाल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.