खेड(प्रतिनिधी) गणेशोत्सवात गणेश विसर्जनदरम्यान भाविकांसाठी लाखो रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या गणेश विसर्जन कट्ट्यावर परप्रांतीय वास्तव्यास
असल्याची बाब प्रहार ने मांडली होती याची तातडीने गंभीर दखल घेत त्यांचा अखेर तळ उठवला. यामुळे परिसर स्वच्छ झाल्याने यापूर्वी येथे न. फिरकणारे नागरिक आता विरंगुळ्यासाठी गणेश विसर्जन कट्ट्यावर दाखल होत आहेत.
जगबुडी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन केले जाते. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी जगबुडी नदीकिनारी विसर्जन कट्ट्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या विसर्जन कट्ट्यावर गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय वास्तव्यास होते. या परप्रांतीयांच्या वास्तव्यामुळे विसर्जन कट्ट्याचे विद्रुपिकरण झाले होते. याशिवाय त्यांच्याकडून परिसर देखील अस्वच्छ होत होता. गणेश विसर्जन कट्ट्यावर परप्रांतीयांनी मुक्काम ठोकलेला असतानाही नगरप्रशासनाने त्याकडे कानाडोळा केला होता. यामुळे परप्रांतीयांचे चांगलेच फावले होते.
गणेश विसर्जन कट्ट्यावर वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीयांमुळे त्यांच्यामध्ये वादाचे प्रसंग देखील वारंवार घडत होते. यामुळे गणेश विसर्जन कट्ट्यावर फावला वेळ घालवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी याकडे पाठ फिरवली होती.या बाबतीत तळ हलवण्यासाठी न प ने कारवाई करत परिसरही स्वच्छ केला. यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
गणेश विसर्जन कट्ट्यावरील सद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांचा तळ उठला असला तरी पुन्हा दुसरे परप्रांतीय याठिकाणी वास्तव्यास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नगरप्रशासनाने गणेश विसर्जन कट्ट्यावर परप्रांतीयांच्या मुक्कामास अटकाव करण्याचा सूचना फलक लावावा, अशी मागणीही नागरिकांतून करण्यात येत आहे.









