लोटे एमआयडीसी बंबावर मदार, तीन महिन्यात ३८ ठिकाणी विझवली आग
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील फुरूस-चांदणीचौक येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण आगीत सिलिंडर स्फोटाच्या अग्नितांडवानंतर उसळलेला आगडोंब नियंत्रणात आणताना येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अग्निशमन बंब दुरूस्तीसाठी चिपळूण येथे दुरूस्तीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे आता आगीसारखी दुर्घटना घडल्यास आणखी काही दिवस तरी लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन बंबावर मदार राहणार आहे. गेल्या तीन महिन्यात येथील अग्निशमन केंद्रातील बंबाने तब्बल ३८ ठिकाणी लागलेली आग विझवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागात वणव्यांसह आगीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. दुकानांनाही शॉर्टसर्किटने आगी लागत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील घरांना शॉर्टसर्किटसह सिलिंडर स्फोटांमुळे आगी लागून घरेच बेचिराख होत आहेत. आतापर्यंत ४ घरे जळून खाक झाली आहेत. तब्बल २२ वणवे लागले असून दोन वाहनेही जळून खाक झाली आहेत. आगीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी अग्निशमन केंद्रातील कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. आधीच अग्निशमन केंद्रात अपुरे बळ असतानाही कर्मचारी प्रसंगावधान अन् तत्परता दाखवत आगीच्या घटना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत ग्रामस्थांना दिलासा देत आहेत. मात्र बऱ्याचवेळा आग लागलेल्या घरापर्यंत रस्त्यांअभावी पोहचण्यास निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे घरे भस्मसात होवून ४ कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले. ५ दिवसांपूर्वी फुरूस-चांदणीचौक येथे मोहम्मद तिसेकर यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घर पूर्णपणे खाक झाले. सिलिंडर स्फोटांनी उसळलेला अग्नितांडव आटोक्यात आणताना अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.
याठिकाणी उसळलेला आगडोंब आटोक्यात आणल्यानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबामध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हा बंब दुरूस्तीसाठी चिपळूण येथे पाठवला आहे. यामुळे सारी मदार आता आणखी काही दिवस लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन बंबावर राहणार आहे.
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील घेरापालगड येथे मध्यरात्रीच्या सुमारास अनिल सुर्वे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घर भस्मसात झाले. आग आग विझवण्यासाठी लोटे औद्योगिक वसाहतीतील बंबास पाचारण करण्यात आले. मात्र याठिकाणी रस्त्याअभावी बंब ३०० मीटर अंतरावरच थांबवून सिंटेक्सच्या टाक्यातून पाणी मारून विझवण्याची वेळ आली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचा चिपळूण येथे पाठवलेला अग्निशमन बंब दुरूस्ती होवून येथील केंद्रात नेमका कधी दाखल होतो, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अग्निशमन केंद्रात आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता
खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्रात सद्यस्थितीत २ फायरमन व १ वाहनचालक कायमस्वरूपी व ३ सहाय्यक फायरमन व १ वाहनचालक कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. सद्यस्थितीत अवघे ७ कर्मचारी सेवा बजावत आहेत. यामुळे आगीबाबतचा कॉल आल्यानंतर तातडीने घटनास्थळ गाठून आग नियंत्रणात आणताना कार्यरत कर्मचाऱ्यांची दमछाक होते. यामुळे केंद्रात २४ तास कर्मचारी कार्यरत ठेवण्यासाठी आणखी एका वाहनचालकांसह ४ फायरमनची आवश्यकता आहे.










