चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूया- आ. शेखर निकम
चिपळूण (प्रतिनिधी):– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचं संरक्षण विभाग सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. देश बदलतो आहे. चीन- पाकिस्तान देश कधीही आक्रमण करतील असे नेहमी वाटत असायचे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. ही निवडणूक देशासाठी आहे. देशाला बळकट करण्यासाठी आपले मतदान महत्वाचे आहे. यामुळे आपण सर्वांनी मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. मतदारसंघ पिंजून काढला पाहिजे. जात- धर्म बाजूला ठेवून ‘सबका साथ- सबका विकास’ या ब्रीद वाक्याप्रमाणे मोदी सरकारने काम केले आहे. मोदी सरकारच्या कोणत्या तरी योजनेचा आपण लाभार्थी आहोत, हे मतदारांना पटवून दिले पाहिजे आणि महायुतीच्या उमेदवाराला होणाऱ्या प्रत्येक बुथवर ७० टक्के पेक्षा जास्त मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी चिपळूणमधील राधाताई लाड सभागृहात ग्रामीण भागातील महायुतीच्या मेळाव्या प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, प्रमोद अधटराव, माजी सभापती सौ. पूजा निकम शौकत माखजनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी शहराध्यक्ष सौ आदिती देशपांडे माजी नगरसेविका शिवानी पवार, भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगरसेवक परिमल भोसले, भाजपा चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेविका सौरसिका देवळीकर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी, पंचायत समिती माजी सदस्य बाबू साळवी, डॉ. राकेश चाळके, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी उपसरपंच विनोद भुरण, माजी ग्रामपंचायत सदस्य विनय दाते आदी उपस्थित होते.
यावेळी आ. शेखर निकम म्हणाले की, महायुतीचा उमेदवार कोण हे आपल्याला माहीत नाही. मात्र, आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचे काम करून उमेदवाराला निवडून आणायचे आहे. ही देशाची निवडणूक असून देशाला कणखर नेतृत्व आवश्यक आहे. ते नेतृत्व गेली दहा वर्षे देशासाठी काम करीत आहे. केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मोदी सरकारमध्ये आपला हक्काचा खासदार असणे आवश्यक आहे यादृष्टीने आपण सर्वांनी काम करूया! असे महायुतीच्या उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, या मतदारसंघाचे आपण आमदार असल्याने आपली सर्वाधिक जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागरूकतेने काम करणे गरजेचे आहे. आपण प्रत्येकाने सर्वांनी आपापले गड अबाधित ठेवूया. सावर्डे विभागात जेवढे मताधिक्य मिळाले त्याहीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊया! यासाठी सावर्डे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतील, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी यावेळी दिला. लोकसभा निवडणुकीत ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे राहील? यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया, असे आ. निकम यांनी आवाहन केले.
यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर आदींनी आपली मनोगते मांडली. हा महायुतीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मेळाव्याचे सूत्रसंचालन भाजपा व रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले.












