वैभववाडी |प्रतिनिधी
अज्ञाताने लावलेल्या वनव्यात अरुणा प्रकल्पाचे एचडीपी पाईप जळून खाक झाले आहेत. यामुळे धुराचा मोठा लोळ मांगवली परिसरात पसरला आहे. या आगीत पाईप जळाल्याने जवळपास दोन कोटीचे नुकसान झाले आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. अरुणा प्रकल्पाचे अधिकारी व ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले आहे.
मांगवली रवळनाथ मंदिर शेजारी ९०० ते १००० एमएमचे एचडीपी पाईप चा डेपो करण्यात आला होता. अरुणा प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कालव्यासाठी स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या वतीने पाईप आणण्यात आले होते. या पाईपला रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पाईप जळून खाक झाले आहेत. आगीचा लोळ भयानक होता. मांगवली परिसरात धुराचे लोळ पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच मांगवली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु आग आटोक्यात नव्हती. या घटनेत ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले आहे.











