महावितरणचा भोंगळ कारभार समोर

खेडमध्ये वीजमीटर एकाचा अन् वापर मात्र दुसऱ्याचा! 
खेड(प्रतिनिधी)
खेड महावितरणकडून वीजबिलाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष पथकांमार्फत धडक कारवाईची मोहीम राबवली जात आहे. वीजपुरवठा खंडित केला जात असतानाच दुसरीकडे मात्र वीजमीटर एकाचा अन् वापर मात्र दुसरऱ्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील चाकाळे येथे असा प्रकार घडला असून महावितरणचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
तालुक्यातील चाकाळे वास्तव्यास असलेल्या अशोक मारूती यादव यांनी २० मार्च २०२४ रोजी घराच्या वरच्या मजल्यावर नवीन मीटरसाठी ऑनलाईन अर्ज भरला. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर २४ मार्च २०२४ रोजी त्यापोटीची रक्कम येथील महावितरणच्या कार्यालयात भरणा करत रितसर पावती घेतली. २-३ दिवसात बीजमीटर बसेल, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, महिनाभराचा कालावधी लोटूनही त्यांच्या घरी वीजमीटर बसलेला नव्हता. तरीदेखील ५ एप्रिल रोजी त्यांना मीटरचे वीजबील महावितरणकडून देण्यात आले वीजमीटर बसलेला नसतानाही ३७० रूपयांचे वीजबील हाती पडताच अशोक यादव यांना धक्काच बसला. महावितरणचे कर्मचारी वसुलीसाठी त्यांच्या घरीही पोहचले. दरम्यान, आपल्या नावे असलेला वीजमीटर अन्य कोणी अनधिकृतरित्या वापर असल्याची बाब उघड झाली. या बाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून संबंधितांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे अशोक यादव यांनी सांगितले.