खेड मधील भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुल बनलंय पार्किंग स्पॉट

खेड(प्रतिनिधी) शहरातील कै. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने नगर प्रशासनाने नाट्यगृहाच्या आवारात वाहने उभी
करण्यास मज्जाव केला आहे. यामुळे सद्यस्थितीत कै. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलासमोरील मोकळ्या जागेत वाहने उभी केली जात असल्याने हा परिसर पार्किंग स्पॉट बनला आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरात आधीच एकदिशा मार्गाची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याने मुख्य बाजारपेठेत रस्त्यालगत उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. भर बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रणरणत्या उन्हात वाहनचालकासह पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेत बेशिस्त वाहनचालकांना दणका दिला होता. मात्र ही कारवाईची मोहीम मोजकेच दिवस राबवण्यात आल्याने पुन्हा वाहने कोणत्याही पद्धतीने रस्त्यालगत उभी केली जात आहेत.
कै. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलात अनेक दुकानांसह वकिलांची व इतर कार्यालयेही आहेत. यामुळे परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र याच परिसरात अन्य वाहनचालक वाहने उभी करत असल्याने येथे खरेदीसह दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची कोंडी होत आहे.
 एकीकडे जागेअभावी पार्किंगचा प्रश्न जटील बनलेला असताना दुसरीकडे नगर प्रशासन वाहनचालकांसाठी वाहने उभी करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देत नाही. मोकळ्या जागेचा शोधला पर्याय एकीकडे वाहनचालकांना वाहने उभी करायची कुठे? असा प्रश्न सतावत आहे.
नाट्यगृहाच्या आवारातील मोकळ्या जागेचा पर्याय अनेकांना शोधला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने नगर प्रशासनाने नाट्यगृह आवारात वाहने उभी करण्यास अटकाव करत फलक लावत कायदेशीर कारवाईची तंबी दिली आहे. यामुळे अनेकांनी कै. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलासमोरील म कळ्या जागेत वाहने उभी करण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यालगत दोन्ही बाजूला उभी केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे हा परिसर पार्किंग स्पॉट च बनत चालला आहे.