कोकण रेल्वे मार्गावर ‘विकेंड ला ८ रेल्वेगाड्या धावल्या ‘लेट

खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या ८ रेल्वेगाड्यांना ‘विकेंड’ला ‘लेट धावल्या . रविवारी कोच्युवेली एलटीटी एक्सप्रेसच्या प्रवाशांची तब्बल ७ तास रखडपट्टी झाल्याने प्रवाशांना घाम फुटला. एलटीटी- थिविमसह एलटीटी-मडगाव ५ तास विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम राहिला. अन्य ५ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागला. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
उन्हाळी सुट्टीचा हंगाम संपुष्टात आल्याने चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्लच धावत असून प्रवाशांना रेल्वेगाड्यांमध्ये एन्ट्री मिळवताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. तोबा गर्दीमुळे प्रवाशांना लटकंतीचा प्रवास करावा लागत असून इच्छितस्थळ गाठताना प्रवाशांची दमछाक होत आहे. विक्रमी गर्दीमुळे प्रवाशांचा रेटारेटीचा अन् लोंबकळत प्रवास सुरू असतानाही चाकरमानी रेल्वेगाड्यांनाच
सर्वाधिक पसंती देत आहेत.
तर एकीकडे चढाओढीचा प्रवास सुरू असताना दुसरीकडे विलंबाच्या प्रवासाचा मनस्तापही कायमच आहे. नागपूर-मडगाव स्पेशल ४ तास २० मिनिटे सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस २ तास ४५ मिनिटे रविवारी उशिराने रवाना झाल्या. एलटीटी-मडगाव एक्सप्रेस ५ तास १५ मिनिटे तर कोच्युवेली एक्सप्रेस २ तास १५ मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. ओखा एक्सप्रेस २ तास ४० मिनिटे तर जामनगर-तिरूनेलवेली एक्सप्रेस १ तास विलंबाने धावली. या पाठोपाठच सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने रवाना झाली.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसत आहे. ‘विकेंड’ला रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना  त्रासा चा  प्रवास करत इच्छितस्थळ गाठावे लागले.