कळंबणी तील रूग्णवाहिका नावापुरत्याच

विविध समस्येंच्या गर्तेत असताना नवी अडचण, रूग्णांची हेळसांड
 खेड(प्रतिनिधी) मुंबई- गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले व अपघातग्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरलेले कळंबणी उपजिल्हा रुग्णालय रिक्तपदांसह नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकलेले असतानाच त्यात आता चालकांअभावी नावापुरत्याच राहिलेल्या दोन रुग्णवाहिकांची भर पडली आहे.यासाठी कंत्राटी पद्धतीवर एकच चालक कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. बऱ्याचवेळा डिझेलचा पत्ताच नसतो. यामुळे रुग्णांना खासगी रुग्णवाहिकांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे.
 कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आस्थापनेत ९३ पदे मंजूर असतानाही ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ५१ अन्य कर्मचाऱ्यांची पदे अद्याप रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्युटी  बजावताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांसाठी दोन अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असल्या तरी सद्यस्थितीत केवळ एकच कंत्राटी पद्धतीवरील चालक कार्यरत आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासह प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक
असते. मात्र सारा भार एकाच रुग्णवाहिका चालकावर असल्याने चालकाला ड्युटी बजावताना तारेवरची कसरत करावी लागते यामुळे बऱ्याचवेळा रुग्णांना खासगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागतो. बऱ्याचवेळा कार्यालयीन चालकास वेळेवर पगार देखील दिला जात नसल्याची ओरड सुरू आहे. याशिवाय रूग्णवाहिकेमध्ये बऱ्याचवेळा डिझेलचाही पत्ता नसतो. यामुळे रुग्णावर बाका प्रसंग उद्भवल्यास सर्वसामान्य रूग्णांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.