सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर

लांजातील भक्ती गोरे, ऋग्वेद बोडस ठरले टॅबचे मानकरी

लांजा (प्रतिनिधी) सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यामध्ये जिल्ह्यास्तरीय यादीत लांजा तालुक्यातील ऋग्वेद बोडस, भक्ति गोरे, राजवीर कुराणी यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे व जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांचे वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर परीक्षा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी आणि सातवीसाठी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेत रत्नागिरी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत इयत्ता सातवी मध्ये प्रथम क्रमांक ऋग्वेद रुपेश बोडस (लांजा हायस्कूल), सहावी मध्ये प्रथम भक्ति दत्ताराम गोरे (लांजा हायस्कूल) तर चौथी मध्ये प्रथम राजवीर कुराणी (लांजा नं.५) यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे इयत्ता दूसरी मध्ये जिल्ह्यात पाचवा वेदांत मुकुंद फड (लांजा नं.५), चौथी मध्ये जिल्ह्यात तिसरा स्वानंद राहुल सिनकर ( लांजा नं.५), सहावी मध्ये जिल्ह्यात तिसरी धनुष्का धनाजी हजारे ( लांजा हायस्कूल), तर सातवी मध्ये जिल्ह्यात तिसरी अगस्त्य संजय खंदारे ( लांजा हायस्कूल) आणि पाचवी प्रांजली किशोर मानकर ( लांजा हायस्कूल) आदी विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले आहेत.

या स्पर्धेतील इयत्ता दुसरी, तिसरी व चौथी मधील प्रथम ५ गुणानुक्रमांकांना अनुक्रमे रोख रुपये २०००, १८००, १२००, १००० तसेच सहावी, सातवी, आठवी मधील प्रथम ५ गुणानुक्रमांकांना अनुक्रमे रुपये २५००, २०००, १५००, १२००, १००० आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुका गुणवत्ता यादीत प्रथम ३ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके रुपये ७५०, ५००, ४०० व सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच इयत्ता सहावी, सातवी मधील जिल्ह्यातील प्रथम क्रमांकास टॅब देण्यात येणार आहे. तर गुण १५२ ते २०० सुवर्ण पदक, १३२ ते १५० रौप्यपदक, ११२ ते १३० कांस्यपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत व अध्यक्षा सौ.संजना सावंत यांनी अभिनंदन केले असून जूनमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना जाहीर कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.