दुचाकीवरून जात असताना कुत्रा आडवा आल्याने रात्री झाला अपघात
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अवधूत किशोर निकम (वय- 45) रा. कुंभारमाठ म्हाडा कॉलनी यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. कुत्रा आडवा आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिशन अवधूत निकम हे शहरातील आपले काम आवरून दुचाकीने कुंभारमाठ येथे घरी जात असता शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने रस्त्यावर पडून त्यांचा अपघात झाला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अवधूत यांच्या अकाली निधनाने शहर, कुंभारमाठ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच ग्रामीण रुग्णालय परिसरात त्यांच्या मित्रपरिवारांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात अपघाताची माहिती घेतली.









