Malvan | श्री देव वेताळ मंदिर देवस्थान पेंडूरला ग्रामीण तीर्थक्षेत्र “ब” वर्ग दर्जा प्राप्त

 

मालवण | प्रतिनिधी   

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत श्री देव वेताळ मंदिर देवस्थान तीर्थक्षेत्रास “ब” वर्ग दर्जा प्राप्त झाला असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्तावाची फाईल आठ महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. यापूर्वी श्री देव वेताळ मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होता. आता तो रद्द करून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व उपसचिव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असणाऱ्या देवस्थानांना विकासकामे करण्यासाठी राज्यसरकारकडून मोठ्या प्रमाणात भरीव निधी दिला जातो. ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे श्री देव वेताळ मंदिर देवस्थान आणि पेंडूर गावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन देवस्थानचे सचिव श्री. अमित कुळकर्णी यांनी व्यक्त केले.

सुमारे ३५० वर्ष जुन्या आणि ऐतिहासिक वारसा परंपरा लाभलेल्या श्री देव वेताळ मंदिर देवस्थानास “ब” वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे सदर देवस्थान एक उत्कृष्ट धार्मिक पर्यटनस्थळ म्हणुन विकसित होऊ शकेल. त्रैवार्षिक देवीचा मांड उत्सवासारख्या मोठ्या यात्रेस जिल्ह्यातून, पर जिल्ह्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक भक्त देवस्थानास भेट देतात. “ब” वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे पेंडूर गावातील श्री देव वेताळ देवस्थानात पर्यटकांचा ओघ वाढून रोजगार निर्मिती होऊन गावाचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

या गावचे सुपुत्र आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली या पुढील काळात वेताळ मंदिर देवस्थान धार्मिक पर्यटनस्थळ विकसित करून त्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.