नवी दिल्ली : दोन मुलांचे मृतदेह आणि जखमी अवस्थेतील आई घरात आढळून आल्यानंतर दिल्ली हादरली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पूर्व दिल्लीच्या पांडव नगर पोलीस स्टेशनला एक फोन कॉल आला आणि श्यामजी गायब आहे आणि त्यांचं घर कालपासून बंद आहे, असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं.
यानंतर पोलिसांची टीम लगेचच घटनास्थळी पोहोचली. पूर्व दिल्लीतल्या शशी गार्डनच्या गल्ली नंबर 6 मधलं ते घर बाहेरून बंद होतं, यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला. घरामध्ये गेल्यावर बघितलेलं दृष्य पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. घराच्या आत दोन मुलांचे मृतदेह होते, तर मुलांच्या शेजारी त्यांची आई जखमी अवस्थेत पडली होती. पोलिसांनी मुलांच्या आईला लगेचच जवळच्या एम्स हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तपासाला सुरूवात केली.
42 वर्षांच्या श्याम जी नावाच्या व्यक्तीच्या भावाने पोलिसांना फोन केला. कालपासून आपण घरी जात आहोत, पण घराचा दरवाजा बंद आहे आणि कुणी फोन उचलत नाहीये, असं त्याने पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराच्या आत 15 वर्षांचा मुलगा कार्तिक आणि 9 वर्षांची आस्था मृतावस्थेत होते. दोन्ही मुलांच्या बाजूलाच त्यांची आई सन्नो जखमी अवस्थेत होती.
श्यामजी यांचं पूर्व दिल्लीत चहाचं दुकान होतं. श्यामजी आणि त्यांची पत्नी सन्नो दोन मुलांसह 8 महिन्यांआधी शशी गार्डनच्या गल्ली नंबर 6 मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहायला आले होते. या कुटुंबाने घर विकत घेतलं होतं. श्याम उत्तर प्रदेशच्या प्रतापगडचे रहिवासी आहेत. कालपासून श्यामही गायब आहे. दोन मुलांची हत्या करून तसंच पत्नीच्याही हत्येचा प्रयत्न करून श्याम गायब झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस सध्या श्यामचा शोध घेत आहेत, ज्यामुळे डबल मर्डर केसचं कोडं उलगडू शकेल. घरातले वाद, विवाहबाह्य संबंध या एँगलनेही पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
दोन मुलांची हत्या झाल्याचं समजताच गल्लीत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. नातेवाईक आणि जवळच राहणारा श्यामचा भाऊही तिथे पोहोचला. नववीत शिकणाऱ्या कार्तिक आणि सहावीत शिकणाऱ्या आस्थाची एवढ्या कृरपणे कोण हत्या कसं करू शकतं? यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. कालपासून घराला कुलूप होतं, दार वाजवलं तरी कुणी बाहेर येत नव्हतं, त्यामुळे आम्ही आज पोलिसांना बोलावलं, तेव्हा आत दोन मृतदेह होते, असं श्यामचे नातेवाईक विजय यांनी सांगितलं.
बापानेच आपल्या दोन मुलांना संपवून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केला का? का यामागे आणखी कोणीतरी आहे? याबाबतचं गूढ अजूनही कायम आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. तसंच पोलीस आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही तपासत आहेत. तसंच शेजारचे आणि नातेवाईकांचीही चौकशी सुरू आहे.












