सावंतवाडी :
वनसंज्ञा सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे अस्तित्वात आली त्याच्याशी नारायण राणे यांचा काहीही संबंध नाही. सुप्रीम कोर्टाने वनसंज्ञेचा निर्णय दिला होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी एका रात्रीत बेचाळीस हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेखाली नोंद केली. यासंदर्भात सुप्रीम कोर्टातही प्रतिज्ञापत्र सादर केले. उलट या नोंदीला राणेंचा विरोध होता. आता विरोधक वनसंसंज्ञेच्या नावाखाली पत्रक काढून राणेंची बदनामी करत आहेत. मुळात निवडणुकीमध्ये पत्रकबाजी करताना प्रकाशकाचे नाव त्याखाली असले पाहिजे शिवाय किती प्रति छापणार ते नमूद पाहिजे मात्र असा कुठलाही प्रकार या पत्रकाच्या बाबतीत दिसून येत नसल्याने आम्ही यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत केवळ विनायक राऊत आणि महाविकास आघाडीला पराभव दिसू लागल्याने ते अशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, अशी टिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
ना. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिंदे सेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाप्रमुख उदय भोसले, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, अमित परब, अशोक पवार आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीला खासदार विनायक राऊत यांचा पराभव दिसू लागल्याने पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे निनावी पत्रके काढून महायुतीचे उमेदवार नारायण राणेंची बदनामी करत आहेत. पण राणे हे कोकणाची अस्मिता असून त्यांची बदनामी जनता खपवून घेणार नाही उलट राणेंना मताधिक्याने निवडून आणून पुन्हा लोकसभेत पाठवतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंना मानणारा वर्ग आहे. ही लढाई विकासाची लढाई आहे. माझी लढाई ही वैचारिक होती. आणि विकास माझं पॅशन आहे. त्यामुळे विकास करणाऱ्या नारायण राणेंना माझा पाठिंबा आहे दुसरीकडे राणे हे आक्रमक नेते आहेत त्याच गतीने ते काम करतात म्हणून त्यांनी गेल्या सहा महिन्यात जिल्ह्याचा कायापालट केला. मात्र वनसंस्थेच्या नावाखाली नारायण राणेंच्या बाबतीत खोटा प्रचार करून बदनामी करणारे खासदार विनायक राऊत हे गेले दहा वर्ष या ठिकाणी नेतृत्व करत होते मग त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नारायण राणे हे मंत्री आहेत आणि निवडून आल्यानंतर पुन्हा ते मंत्री होणार आहेत. त्यांना कोकणचा वाघ म्हणून ओळखले जाते. ते कोकणची अस्मिता आहेत त्यामुळे इथली कोकणी जनता त्यांना ऐशी टक्के मतदान देऊन पुन्हा एकदा लोकसभेत पाठवतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.












