ॲड. असीम सरोदे यांची “निर्भय बनो ”सभा मातोश्रीची सुपारी घेऊन केलेला राजकीय प्रयोग 

माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक यांचा आरोप 

जहाल व ललकारीयुक्त विधाने करून शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न 

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी 

सावंतवाडी । प्रतिनिधी : विचारांची सभा अशा आशयाखाली विचारवंतांना एकत्र करून ॲड. असीम सरोदे व विश्वंभर चौधरी यांनी घेतलेली ‘निर्भय बनो ‘ सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीची सुपारी घेऊन केलेला राजकीय प्रयोग असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने जहाल व ललकारीयुक्त विधाने केल्यावर शांततेचा भंग होणारी कृत्ये घडतील त्याचा फायदा निवडणुकीत आपल्या सग्यासोयऱ्यांना मिळेल हा कुटील डाव या मागे असल्याचा आरोप करतानाच याबाबत आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सावंतवाडी नगर परिषदेचे माजी सभापती ॲड. परिमल नाईक यांनी दिली.

 

विश्वंभर चौधरी व ॲड. असीम सरोदे यांची सभा म्हणजे अराजकीय कारण पुढे करून शतप्रतिशत राजकीय व लोकसभा प्रचाराचा नारळ हातात घेऊन केलेला अवास्तव प्रवचनाचा एक देखावा होता. ॲड. असीम सरोदे यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीला ही सभा म्हणजे विचारांची सभा असल्याचे विधान केले. परंतु संपूर्ण सभेचा परामर्श घेता ही एक प्रचार सभा असल्याचेच स्पष्टपणे दिसून आले. कारण ॲड. सरोदे यांनी संविधान व कायदेशीर तरतुदी या विषयी आपल्या भाषणात फारसा उल्लेख न करता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका टिपणी व अनाठायी आरोप करण्यातच धन्यता मानली.

 

भारतीय संविधान एक राष्ट्रीय ग्रंथ असून तो अबाधित व सुरक्षित आहे व मोदी सरकारने तशी हमी सुद्धा दिलेली आहे. या पूर्वी वेळोवेळी केलेल्या घटनादुरुस्ती यांचं सोयीस्कर समर्थन करताना ॲड. सरोदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर विनाकारण संशय निर्माण करून जनतेत संविधानाविषयी संभ्रम निर्माण करत आहेत. कलम ३७० हटवून मोदी सरकारने केलेली धीट व जगात प्रशंसा केलेली अद्वितीय कारवाई या बद्दल कदाचित त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना पोटशूळ असावा. तसेच भारतीय नागरिक असून सुद्धा दारुण पराभव वाटत असेल म्हणूनच केवळ प्रसिद्धी करिता ते बदनामी नाट्य पुढे करून वणवण फिरत आहेत. “ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखा”हा एक अघोरी प्रकार आहे. मात्र, कोकणी जनता भूतानुभवातून बरंच काही शिकलेली असल्याने विरोधकांचे तत्सम मनसुबे मुळीच यशस्वी होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

भय आणि निर्भय या मधील सुवर्णमध्य हरवलेलं एक रटाळ प्रवचन या सभेच्या माध्यमातून पहायला मिळालं. ॲड. सरोदे हे एक वैफल्यग्रस्त असामी असून त्यांनी विधानसभा आमदार अपात्रतेच्या चौकशीच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने सहाय्य्क वकील म्हणून चाखलेली पराभवाची फळे व खालेल्या चपराकीचे चटके ते अजूनही विसरलेले नाहीत आणि म्हणूनच ते लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व लोकनेते नरेंद्र मोदी व इतर नेत्यांबद्दल बेताल व विपर्यास करणारी वक्तव्ये निर्भयता व संविधान सारखे संवेदनशील विषय विनाकारण पुढे करून करत सुटले आहेत.वस्तुत: आम जनतेमध्ये कोणताही भय नसून विरोधक मोदींना मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे भयभीत झालेले आहेत, असेही ते म्हणाले.

 

वकिली व्यवसाय व वकील वर्ग यांच्याबद्दल नितांत आदर आहे. वकील मंडळी फी घेऊन वकीलपत्र दाखल करतात व प्रामाणिकपणे काम पाहतात हे आजपर्यँत माहिती होतं. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपाऱ्या घेऊन स्तुतीपाठकाचे सोंग घेतात हे या निमित्ताने नव्याने पहायला मिळालं. त्यामुळे त्यांची

विश्वासार्हता धोक्यात येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं राजकीय वय असेल तेव्हढं ॲड. सरोदे यांचे पूर्ण वय देखील नाही. राणेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देश, महाराष्ट्र राज्य व प्रामुख्याने मुबंई व कोकण प्रांतासाठी दिलेलं योगदान सर्वश्रुत आहे. त्यांना मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेता आदी मिळालेली विविध पदे त्यांच्या स्वकर्तृत्वावर व परिपूर्ण कार्यक्षमतेच्या निकषावर मिळालेली आहेत. त्यामुळे त्यांचा जनसामन्यातील आदर अशा स्तुती पाठकांच्या व सुपारीबाज वक्त्यांच्या भंपक व धादांत खोडसाळ वक्तव्याने मुळीच कमी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राणे पर्व उदयास येण्यापूर्वी कोकणातील राजकीय नेत्यांना नेहमीच वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम राज्यस्तरीय राजकारण्यांनी केलं. परंतु ना. नारायण राणे यांनी स्वकर्तृत्वावर स्व. बाळासाहेब ठाकरे व इतर राजकीय श्रेष्ठीची मने जिंकून आपलं एक अलौकिक वलंय निर्माण केलं आणि कोकणात एक विकासात्मक दबदबा निर्माण केला.त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीमुळे येत्या निवडणुकीत विरोधकांना लाजिरवाण्या पराभवाची चाहूल लागलेली असल्याने व त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते असले असफल प्रयोग चौका चौकात करत आहेत. परंतु कोकणी जनता सुज्ञ व परिपक्व असून असल्या भुलथापाना अजिबात बळी पडणार नाहीत व त्याचे स्वाभाविक पडसाद ४ जूनला पहायला मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

दरम्यान, लोकसभा निवडणूक कालावधीत अराजकीय विचारसभेची खोडसाळ परवानगी घेऊन सभेत भडकाऊ व बेताल वक्तव्य व आरोप केल्याकारणाने निवडणूक आचारसंहितेचा त्यांनी एकप्रकारे भंग केला आहे. त्यामुळे  त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्यास पात्र असलेला गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारेप्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.