निष्क्रीय खा. विनायक राऊतांनी दहा वर्षातील दहा कामे दाखवावीत
राजापूर (प्रतिनिधी): कोणत्याही देशहिताच्या, विकासाच्या मुद्दयांवर एकमत नाही, काँग्रेस आपल्या जाहिरनाम्यात ३० लाख बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देते तर उ. बा. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत रोजगार देणाऱ्या प्रकल्पांना विरोध करून ते पळवून लावतात. तर संजय राऊत उध्दव ठाकरे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगतात आणि विनायक राऊत राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणतात, बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाचे उ. बा. ठा. चे आमदार राजन साळवी, महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे समर्थन करतात आणि विनायक राऊत विरोध करतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहुल गांधी शिव्या देतात आणि त्याच राहुल गांधीच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे बसतात. त्यामुळे ही महाविकास आघाडी नाही तर ही फुल्ल टू कन्फ्युज आघाडी असल्याची खरमरीत टीका भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
दहा वर्षात काहीही काम न करणाऱ्या व दोन पिढया बरबाद करणाऱ्या विनायक राऊत यांनी दहा वर्षाच्या खासदारकीत दहा कामे केल्याचे दाखवून द्यावे असे आव्हान देतानाच नॉन परफॅारमन्स असेट (एनपीए) झालेल्या या खासदाराला आता घरी बसवा असे आवाहनही जठार यांनी केले.
राजापूरात महायुतीच्या समन्वय समीतीच्या बैठकीसाठी सोमवारी राजापुरात आलेल्या जठार यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा आणि उ. बा. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा खरपूस समाचार घेतला.
कोणत्याही विकासाच्या, देशहीताच्या मुद्दयावर या महाविकास आघाडीत एकमत नाही, खुद्द उबाठा च्या दोन राऊतांमध्येच एकमत नाही. संजय राऊत उध्दव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगतात तर विनायक राऊत राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणतात याला काय म्हणायचे असा खडा सवाल उपस्थित करून आमच्याकडे पंतप्रधान पदाचा नरेंद्र मोदी यांच्या सारखा विकासाची दुरदृष्टी असलेला नेता आहे, तुम्ही तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगा असे आव्हान जठार यांनी दिले.
या मतदार संघातुन नारायण राणे यांच्या सारखा अभ्यासू, दिल्लीत आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातुन आगळी वेगळी छाप उमटवणारा उमेदवार महायुतीने दिल्याने आता महाविकास आघाडीच्या पायाखालची जमिन सरकली आहे, पराभव दिसू लागला आहे, मग आता काही नाही तर भाजपाने कोकणातुन व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन धन्युष्यबाण गायब केल्याचा अपप्रचार सुरू केला आहे. मात्र अशा अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. संपुर्ण कोकण विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे, कल्याण व रायगड-मावळ असे तीन मतदार संघ देण्यात आलेले आहेत,
भाजपाकडे पालघर आणि प रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ आला आहे तर राष्ट्रवादीकडे रायगड मतदार संघ अशी योग्य विभागणी समन्वयाने झालेली आहे. विधानसभा निवडणूकीतही योग्य प्रकारे महायुतीत जागा वाटप होणार आहे. मात्र विकासाचा काहीच मुद्दा नसल्याने अशा प्रकारे महाविकास आघाडीकडून अपप्रचार केला जात आहे, त्याला कुणीही बळी पडणार नाही असा विश्वासही जठार यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना काय भरीव काम केले, प्रकल्प आणला, रोजगार दिला हे विनायक राऊतांनी जनतेला सांगावे असा टोलाही जठार यांनी लगावला आहे.
ना. राणे यांना उमेदवारी जाहिर होताच उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या किरण सामंत, ना. उदय सामंत यांसह सर्व महायुतीचे लोक एकजुटीने कामाला लागले आहेत, त्यांचे आभार व्यक्त करताना जठार यांनी ना. राणे हे मोठया मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
निष्क्रिय खासदार विनायक राऊतांनी दहा वर्षात काय केले हे जनेतला सांगणे आवश्यक आहे, रोजगार देणारे प्रकल्प घालवून बेरोजगारांच्या तोंडातील घास काढणारा हा खासदार आहे, दहा वर्षात शून्य परफॉरमन्स असलेला हा खासदार आहे. आता याला घरी बसविण्याची वेळ आली असून ७ मे रोजी कृतीतुन मतदार हे करून दाखविणार आहेत असेही जठार यांनी नमुद केले.
या पत्रकार परिषदेला आरपीआरचे राजन बेतकर, शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, भाजपा महिला आघाडीच्या सौ. सुयोगा जठार, श्रृती ताम्हनकर, सौ. शितल पटेल, स्वप्नील गोठणकर आदी उपस्थित होते.










