लांजा शहरात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

 

लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरात हॉटेल प्रसन्न शेजारी सुरू करण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

 

आज सोमवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी आमदार प्रमोद जठार, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव तसेच उद्योजक किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा निवडणुक प्रमुख उल्का विश्वासराव तसेच संजय यादव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्घाटनानंतर भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आजपासून तालुक्यात जोराने प्रचार कामाला लागा. आपले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना बहुमताने निवडून आणा असे आवाहन त्यांनी उपस्थित भाजपा आणि महायुतीचा कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश उर्फ मुन्ना खामकर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शहर अध्यक्ष गुरुप्रसाद तेली यांच्यासह जिल्हा तालुका सरचिटणीस विराज हरमले, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर टोळे व अन्य भाजपा पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.