नव्या जगबुडी पुलावर फसगतीला ब्रेक वाहनचालकांवर थेट गुन्ह्यांच
खेड(प्रतिनिधी) भरणे येथील नव्या जगबुडी पुलासह उड्डाण पूल व मध्यवर्ती ठिकाणी विरूद्ध दिशेने वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांमुळे अन्य वाहनचालकांच्या होणाऱ्या फसगतीसह अपघात रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतल्याने कारवाईचा साऱ्यांनीच धसका घेतला आहे. यामुळे विरूद्ध दिशेने वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत घट झाली असून फसगतीलाही ब्रेक लागला आहे. तसेच वाहतुकीलाही शिस्त लागल्याने पादचाऱ्यांनी नि:श्वास टाकला आहे.
भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणची वाहतूक गुंतागुंतीची बनली होती. चारही दिशांना जाणाऱ्या वाहनांमुळे बऱ्याचवेळा अन्य वाहनचालकांची फसगत होत होती. शिवाय कुठेही अन् कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. भरणे येथील नव्या जगबुडी पुलासह उड्डाण पूल व मध्यवर्ती ठिकाणी विरूद्ध दिशेने हाकल्या जाणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने अपघात देखील घडत होते.. विरूद्ध दिशेने वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवत
दंडात्मक कारवाईऐवजी थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हे दाखल होण्याच्या भीतीपोटी अनेकांनी नियमांचे पालन करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाह वाहतुकीत सुरळीतपणा आला आहे.










