सावंतवाडी शहरात ‘मशाल रॅली ‘चा ‘फ्लॉप शो’

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात काढण्यात आलेल्या मशाल रॅलीकडे कार्यकर्त्यांनी अक्षरशः पाठ फिरवली. उबाठा गटाचे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली व आमदार वैभव नाईक त यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीत काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष व उबाठा सेनेचे मिळून शंभर कार्यकर्तेही उपस्थित नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उपस्थित नेत्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपवता आली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास सावंतवाडी शहरातून मशाल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, सावंतवाडीकर नागरिकांनी या रॅलीकडे पूर्णतः पाठ फिरवली. जनतेच्या मतांचा अनादर करणाऱ्या महाविकास आघाडीचा पराभव निश्चित असल्याची चर्चा यावेळी नागरिकांमधून सुरू होती.