म्हैसही जागीच ठार : सोनुर्लीवर शोककळा
सावंतवाडी : रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील शेतकऱ्यासह त्याच्या एका म्हैशीचा जागीच मृत्यू झाला आहे. सोनुर्ली कोल्हेभाटले परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. महादेव जगन्नाथ गावकर (वय ५८, रा. सोनुर्ली ) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव गावकर हे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी त्यांची काही गुरे रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे गेली. त्या गुरांना परत आण्यासाठी गावकर हे त्या ठिकाणी जात असताना रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
यावेळी म्हैशीलाही रेल्वेची जोरदार धडक बसली. यात ते दोघे जागीच गतप्राण झाले. याबाबतची माहिती संबंधित रेल्वे चालकाने मळगावस्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार मनोज राऊत, संतोष गलोले यांनी त्या ठिकाणी भेट देत घटनेचा पंचनामा गेला.
गावकर हे शेतकरी होते. शेती करणे गुरे राखण्याचे काम ते करीत असत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे.











