शिक्षक समिती कणकवली शाखा सामाजिक भान जपणारी शिक्षक संघटना

Google search engine
Google search engine

२२ गरीब-गरजू विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

शिक्षक समिती कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न

कणकवली | प्रतिनिधी : न्यायाची चाड व अन्यायाची चीड ‘ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणारी शिक्षक समिती कणकवली ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच विद्यार्थी हित जोपासत सामाजिक भान जपणारी शिक्षक संघटना आहे. असे गौरवोद्गार शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी कणकवली येथील आयोजित कार्यक्रमात काढले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा नुकताच तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखालीे पार पडला.प्रतिवर्षाप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील २२ गरीब गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन वही दप्तरापासून – छत्री चपलांपर्यंत प्रत्येकी २००० रुपये किमतीच्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी कणकवली शाखेचे कार्य विद्यार्थी हित जोपासणारे व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले.

इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक १८ विद्यार्थी, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये विजेते ११ विद्यार्थी, शिष्यवृत्ती सराव परीक्षेमधील टॉप १० विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन तसेच शिक्षक संघटनेच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेणारे २१ विद्यार्थी व २० शिक्षक, सेवानिवृत्त झालेले शिक्षक व विविध संस्थांच्या माध्यमातून पुरस्काराने सन्मानित झालेले उपक्रमशील शिक्षक अशा एकूण १३५ गुणवंतांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सरचिटणीस महेंद्र पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेच्या सर्व सामाजिक , शैक्षणिक व संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर व शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे *अध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी संघटनात्मक कार्याबरोबरच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना दत्तक घेण्याबरोबरच गंभीर आजारी व अपघातग्रस्त गरीब विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून वर्षभरात ७० हजाराची आर्थिक मदत देण्यात आल्याचे जाहीर केले.

ज्येष्ठ मार्गदर्शक *भाई चव्हाण , चंद्रकांत अणावकर , शिक्षक नेते नंदकुमार राणे , जिल्हा नेते नितीन कदम , शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षा नीलम बांदेकर , महिला आघाडी प्रमुख निकिता ठाकुर , शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी आपल्या मनोगतामध्ये कणकवली शाखेच्या उपक्रमांचे कौतुक केले.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सत्यवान चव्हाण , विनायक जाधव , कल्पना मलये , सरिता पवार , सदाशिव राणे , राजेश कदम यांचा शाल , श्रीफळ , ग्रंथभेट व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. तर प्रवक्ते विनायक जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष चंद्रसेन पताडे, कोषाध्यक्ष लहू दहिफळे, मालवण तालुका अध्यक्ष सुयोग धामापूरकर,सावंतवाडी सचिव प्रकाश आव्हाड, रुपेश गरुड, सुगंध तांबे, तसेच तालुका संघटनेचे पदाधिकारी सर्व सदस्य, महिला आघाडीच्या सदस्य, गुणवंत विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.*