सावंतवाडी (प्रतिनिधी) : संगीत क्षेत्रात काम करणार्या श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने व स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा मर्यादित राधाकृष्ण चषक २०२४ या सांगितिक महोत्सव अंतर्गत शास्त्रीय गायन स्पर्धा (हिंदुस्थानी ख्याल) व सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हि स्पर्धा २३ व २४ मे रोजी आजगाव येथील श्री देव वेतोबा मंदिर सभागृहात होणार आहे.
तळकोकणातील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व त्यांना प्रोत्साहीत करावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे सहावे वर्ष आहे. शास्त्रीय संगीत स्पर्धा खुल्या गटात तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा छोटा व मोठा अशा दोन गटात आयोजित केली आहे.
या स्पर्धेतील शास्त्रीय गायन प्रकारात खुल्या गटासाठी प्रथम क्रमांकासाठी 5501 रु, व्दितीय 3501रु व उत्तेजनार्थ म्हणून 1501रु व 1001रु अशी पारितोषिक व सन्मानचिन्ह ठेवण्यात आलेली आहेत. या गटाची स्पर्धा 23 मे रोजी दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे.
सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेतील लहान गटासाठी प्रथम क्रमाकाकरीता 3001रु व्दितीय 2001रु तृतीय 1001रु व उत्तेजनार्थसाठी 701रु अशी पारितोषिक देण्यात येणार आहे. या गटाची स्पर्धा 24 मे रोजी होणार आहे
प्रथम क्रमांक विजेत्यांना राधाकृष्ण चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक अधिक माहितीसाठी हेमंत दळवी (9423585792) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











