हिंमत असेल तर चर्चेसाठी आमने सामने या!

 

भाजप संविधन बदलणार असा अपप्रचार करणाऱ्या विनायक राऊतना माजी सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांचे खुले आव्हान

बहुजन समाजात गैरसमज पसरवणाऱ्या इंडिया आघाडी उमेदवारांना जनता मतपेटीतूनच योग्य ते उत्तर देणार !

देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच ; रत्नागिरी सिंधुदुर्गात कोकणचे भाग्यविधाते केंद्रीयमंत्री नारायण राणे 3 लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होणार

मालवण | प्रतिनिधी : जनतेची दिशाभूल करायची आणि मते मिळवायची हेच प्रयत्न काँग्रेस आणि उबाठा गटाकडून सुरु आहे. भाजपा संविधान बदलणार असा गैरसमज समाजात पसरवला जात आहे. मात्र, या सर्व अफवा आहेत. बहुजन समाजात गैरसमज पसरविणाऱ्या इंडिया आघाडी उमेदवारांना जनता मतपेटीतूनच योग्य ते उत्तर देईल. स्वतःच्या स्वार्थासाठी 80 वेळा संविधानात बदल करणाऱ्या काँग्रेसनेच जनतेची फसवणूक केली. मात्र, भाजपाने जनतेला अपेक्षित अशाच पद्धतीने 370 कलम हटविण्या बरोबर देश हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे जनता भाजपा महायुती सोबत ठाम पणे उभी आहे. देशात गतिमान विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून कोकणचे भाग्यविधाते केंद्रीयमंत्री नारायण राणे 3 लाखाच्या मताधिक्क्याने खासदार होणार. असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

विनायक राऊत अथवा आघाडीच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर आमने सामने येऊन संविधान बदल याबाबत भाष्य करावे. असे खुले आव्हान अंकुश जाधव यांनी दिले आहे.

मालवण शहर भाजपा कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, चंद्रकांत वालावलकर, रोहन पेंडुरकर, तुषार जाधव आदी उपस्थित होते.

समाजात नेहमीच गैरसमज पसरविण्याचे काम उबाठा व काँग्रेसने केले. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी नवे षडयंत्र आखले असून भाजपा संविधान बदलणार असा गैरसमज जनतेत पसरवीला जात आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनीही वेळोवेळी याबाबत भूमिका मांडताना संविधान बदल केलाच जाणार नाही. या सर्व काँग्रेसच्या अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उलट काँग्रेसनेच त्यांच्या सत्ताकाळात स्वतःच्या स्वार्थासाठी 80 पेक्षा जास्तवेळा संविधान बदलले. मात्र, सत्ताकाळात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिले नाही. भाजपाच्या पाठिंब्यावर जनता दलाचे सरकार देशात आल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या आग्रही मागणी नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न जाहीर झाले. त्यांच्या पत्नी आमचे आदरस्थान यांनी भारतरत्न स्वीकारले. या सर्व गोष्टींचा विचार करता काँग्रेसचे धोरण हे स्वार्थीपणाचे व दुटप्पी राहिले आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचा विचार करता याठिकाणी वंचित समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज, भटके विमुक्त वाडी वस्ती वर जाऊन खासदार विनायक राऊत हे संविधान बदल बाबत गैरसमज पसरवत आहेत. मुळात त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात कोणताही विकास यांनी केला नाही. वाड्या वस्त्यांवर पोहोचले नाही. मात्र आता अफवा पसरविण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे.

मूळ संविधानात कोणताही बदल होणार नाही. याबाबत केशवानंदी भारती या केरळ राज्यातील न्यायालयीन प्रकरणाचा अभ्यास या खासदारांनी तसेच काँग्रेस उबाठा इंडिया आघाडी उमेदवारांनी करावा असेही खडेबोल अंकुश जाधव यांनी सुनावले.

बहुजन वंचितसाठी भाजपा महायुतीच्या माध्यमातून नेहमीच जनहीत व विकासाचा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. याठिकाणीही केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आ. नितेश राणे व महायुती नेते यांच्या माध्यमातून विकास व जनहिताचे धोरण राबविले गेले. त्यामुळे जनता कोणत्याही भुलथापांना बळी न पडता विकासाच्या दृष्टिकोनातून भाजपा महायुती सोबतच ठामपणे उभी राहील असा विश्वास अंकुश जाधव यांनी व्यक्त केला.

मालवण कुडाळ तालुक्याचा विचार करता भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात महायुती एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबवत आहे. आम्ही सर्व पदाधिकारी गेले काही दिवस वाडी वस्त्यांवर फिरत असताना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अंकुश जाधव यासह नवलराज काळे, राजन आंबेरकर, रोहन पेंडुरकर यांनी सांगितले.