नारायण राणे यांना रत्नागिरीतून सर्वाधिक मताधिक्य देणार : पालकमंत्री उदय सामंत

कोकणसाठी सहकाराची विशेष योजना द्यावी
पालकमंत्री उदय सामंत यांनी िदला गृहमंत्री अमित शाह यांना विश्वास

रत्नागिरी (प्रतिनिधी)
महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना  सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची ग्वाही देत कोकणातील आंबा, काजू व अन्य फळप्रक्रियांसाठी तसेच सहकार चळवळ वाढीसाठी सहकाराची विशेष योजना कोकणवासीयांना द्यावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे केली.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या महासभेत पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी त्यांनी देशात मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी, मोदींच्या ४०० पारच्या निर्धारात रत्नागिरी – सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांसमोर दिला. कोकणातील शेतकऱ्यांना सहकारातून समृद्धी साधता यावी, कोकणातील आंबा, काजू व अन्य फळपिक यातून सहकार वाढीस लागावा यासाठी, कोकणसाठी विशेष सहकार योजना राबवावी अशी मागणी त्यांनी ना. शाह यांच्याकडे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने महाराष्ट्र उद्योग-व्यवसायात अव्वल ठरला आहे, मात्र बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी आणखी मोठे उद्योग महाराष्ट्राला द्यावेत, अशी मागणी ना. सामंत यांनी केली.
अमित शाह यांनी पुढाकार घेतला आणि राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ  शिंदे मुख्यमंत्री झाले हे आम्ही कधीही विसरणार नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार उत्तम काम करत आहे. तर ना. राणे यांना रत्नागिरीतून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.