कशेडी बोगद्यातील अवजड वाहतूक हाईट खांब रोखणार

खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हलक्या वाहनांसाठी दुतर्फा खुला झाला. मात्र अवजड वाहनेही बोगद्यातून मार्गस्थ होऊ लागल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आता बोगद्यातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी कशेडी येथील महामार्ग मदत पोलीस केंद्राने पोलादपूर हद्दीतील भोगावनजीक गुरूवारी हाईट खांब  उभारला असून खवटी येथील अनुसया हॉटेल येथेही हाईट खांब उभारण्यात येणार आहे.
कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दुतर्फा वाहतूक व्यवस्थेत गोंधळ उडून वादाचे प्रसंग उद्भवले होते. दुतर्फा बोगद्यातून केवळ हलक्या वजनाच्या वाहनांनाच वाहतुकीची मुभा दिलेली असतानाही अवजड वाहनेही मार्गस्थ होऊ लागल्याने दोन्ही बाजुला वाहतूक
कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अवजड वाहतुकील ब्रेक लावून सुरळीतपणा आणण्यासाठी कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राने भोगाव येथे  थेट हाईट खांब उभारले. यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने बोगद्यातून. मार्गस्थ होण्याचा अवजड वाहनांचा मार्ग बंद झाला. खवटी येथील हॉटेलनजीकही हाईट खांब उभारण्यात येणार आहे.
.
..तर कारवाईचा बडगा
 
कशेडी बोगद्यातून अवजड वाहनांना वाहतुकीची परवानगी नाही. त्यामुळे अवजड वाहनचालकांनी कशेडी घाटाचाच अवलंब करावा. अन्यथा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारावा लागेल, असे कशेडी वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे यांनी स्पष्ट केले.